प्रभात वृत्तसेवा सातारा – बिहार मंत्रीमंडळाच्या शपथ विधी कार्यक्रमा दरम्यान डॉ. नुसरत परवीन यांना नियुक्तीपत्र देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील हिजाब (बुरखा) काढण्यास भाग पाडून प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी साताऱ्यात करण्यात आली आहे . या प्रकरणी येथील जमिअत उलेमा ए हिंद यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात नमूद आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले भारतीय संविधान सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. या धार्मिक व सांस्कृतिक विविधतेमुळेच भारताचा जगभरात सन्मान केला जातो. मात्र, या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे अनेक वरिष्ठ मंत्री व अधिकारी मुस्लिम समाजाविरोधात जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारची भाषणे ही वांशिक अपशब्दांना खतपाणी घालणारी असून सरकारने संबंधित मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना संविधानिक मूल्यांची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष मौलाना रियाज, जिल्हा उपाध्यक्ष अमजद शेख, जनरल सेक्रेटरी शफिक शेख, सेक्रेटरी मौलाना जमीर, तालुकाध्यक्ष मौलाना अशफाक, मुफ्ती अहमद, मौलाना नवाज, हाजी शकील, अबीदभाई सय्यद आणि हाफिज निसार उपस्थित होते.