Satara News : पावसालाही रोखता आलं नाही देशप्रेम; पाटणमध्ये तिरंगा पदयात्रेला जनसागराचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोयनानगर : ऑपरेशन सिंदूर’च्या विजयानंतर भारतीय सेनेच्या पराक्रमाला सलाम ठोकण्यासाठी पाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेला भर पावसातही जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कोयनानगर, पाटण व परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी आणि विद्यार्थी अशा सर्व स्तरातील लोकांनी या यात्रेत देशभक्तीने भारलेला सहभाग नोंदवला.
ही पदयात्रा मंगळवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानातून सुरु झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झालेली ही यात्रा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत पंचयात समितीमधील लोकनेते बाळासाहेब देशाई भवनात समारोपासाठी पोहोचली. पदयात्रा सुरु झाल्यानंतर काही वेळातच आकाशात ढग जमले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मात्र, पावसाच्या झडांनी कोणालाही थांबवले नाही. अंगावर पावसाच्या धारा झेलत नागरिकांनी तिरंगा अधिक उंच फडकवला. भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला होता.
या यात्रेत पाटण तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या सहभागामुळे ही यात्रा सामाजिक ऐक्याचं आणि राष्ट्रप्रेमाचं दर्शन घडवणारी ठरली. ‘भारतीय सेनेने दाखवलेला पराक्रम केवळ लष्करी विजय नाही, तर संपूर्ण देशाच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. आपणही सजग नागरिक म्हणून देशहितासाठी जबाबदारीने वागलं पाहिजे. ही यात्रा त्याच भावनेचं प्रतीक आहे,” पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यांवेळी सागंतले.
राष्ट्रभक्तीचा अविस्मरणीय सोहळा
या संपूर्ण यात्रेदरम्यान देशभक्तीपर गीते, घोषणाबाजी, ध्वजवंदन आणि देशप्रेमाने भारावलेली जनता यामुळे पाटणमध्ये एक आगळं- वेगळं दृश्य पाहायला मिळालं. ही यात्रा केवळ एक कार्यक्रम न राहता, पावसालाही नमवणारी देशप्रेमाची चळवळ बनली.





