satara news: काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांचा राजीनामा

satara news: काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि जिल्हा सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्याकडे पाठवले आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी प्रत्यक्षात यामागे राजकीय कारण असल्याचीही चर्चा आहे.
रणजितसिंह देशमुख यांच्याकडे जिल्हा काँग्रेसची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात पुन्हा पक्ष सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे. पण काही कारणास्तव जुन्या- नव्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यातूनच जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा श्री. देशमुख यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले असले, तरी त्यामागे राजकीय कारण दडल्याचे सांगितले जात आहे. लवकरच ते पुढचा राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांच्यासोबत पाटण तालुक्यातील काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्तेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख हा राजीनामा स्वीकारणार का, याची उत्सुकता आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेली २५ वर्षे काँग्रेस पक्षाबरोबर प्रामाणिकपणे काम केले. सध्या पक्षात काम करत असताना काहींना माझी अडचण होत होती. ती अडचण दूर करण्यासाठी आपणच बाजूला होत आहे. मी नेहमी पक्ष हिताचा विचार केला. पक्षातून बाजूला होताना अतीव दुःख होत आहे.
नरेश देसाई (जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस)





