Satara News : कोयना विभागातील हेळवाक जिल्हा परिषद गट आणि संबंधित पंचायत समिती गणांतील निकालाने स्थानिक राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. चार दशकांहून अधिक काळ प्रभाव राखणाऱ्या प्रस्थापित गटाला मतदारांनी यावेळी स्पष्ट नकार दिला. होमपिचवरच गड राखता आला नाही आणि भगव्याने सत्ताबदलाचा नवा अध्याय लिहिला. हेळवाक जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अशोकराव पाटील 1,046 मताधिक्याने विजयी झाले. पंचायत समिती पातळीवर हेळवाक गणातून मंगल माने आणि येराड गणातून विद्या शिंदे विजयी झाल्याने बदल सर्वंकष असल्याचे स्पष्ट झाले. निकाल एकाच दिशेने झुकला आणि प्रस्थापित राजकारणाच्या पाया हलले. पंचायत समिती गणात व जिल्हा परिषद गटात सत्ताधारी पाटणकर गटाच्या सदस्यांची सुमार कामगिरी हा पराभवाचा मुख्य घटक ठरल्याची चर्चा आहे. अनेक मंजूर कामे प्रत्यक्षात दिसली नाहीत, स्थानिक प्रश्नांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा झाला नाही आणि मतदारांशी थेट संपर्क कमी पडला. सत्तेचा लाभ असूनही कामगिरीचा ठसा उमटला नाही, अशी भावना गावागावांत होती. माजी सभापती राजाभाऊ शेलार आणि माजी सदस्य बबनराव कांबळे यांच्याविषयीही नाराजीचे सूर ऐकू येत होते. दीर्घकाळ सत्तेत राहिल्यानंतर अपेक्षा वाढतात; पण त्या पूर्ण करण्यात कमी पडल्याचा ठपका ठेवला जात होता. राजाभाऊ शेलार यांनी यावेळी घेतलेली माघार ही बदलत्या समीकरणांची जाणीव असल्याचे संकेत मानले जात आहेत. बबनराव कांबळे यांच्या कार्यकाळात ठोस विकासकामांचा परिणाम जाणवला नाही, अशी भावना काही भागांत होती. तिकीट वाटपातील निर्णयांमुळेही कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. स्थानिक इच्छुकांना डावलल्याची भावना आणि अंतर्गत मतभेद यामुळे संघटनात सैलपणा आला. ‘हा आपलाच गड आहे’ या आत्मविश्वासाने सावधगिरी कमी पडली. मतदारांनी मात्र गृहीत धरण्याची प्रवृत्ती नाकारली. दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील संघटनयंत्रणा सक्रिय राहिली. बूथस्तरापर्यंत नियोजन, प्रचारातील सातत्य आणि विकासकामांचा हिशेब मांडण्याची रणनीती प्रभावी ठरली. हेळवाक गण व गटात वाढलेले मतदानही निर्णायक ठरले. कोयनापुत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक शशिकांत जाधव यांनी विविध योजनांचा लाभार्थी वर्गाशी साधलेला थेट संपर्क आणि गावागावांत केलेला समन्वय याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे मानले जात आहे. महिलावर्ग आणि युवक मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. निवडणूक जाहीर झाल्यापासून अत्यंत संयमाची व संघटनेला दिशादर्शक भूमिका घेणारे संघर्षयोध्दा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांचा या विजयात महत्त्वाचा वाटा असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. मतभेदांवर नियंत्रण ठेवत संघटन एकसंध ठेवणे, प्रचारयंत्रणा गतिमान करणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे या बाबींमुळे शिवसेनेला बळ मिळाले. या संपूर्ण निकालाचा अर्थ स्पष्ट आहे. मतदार आता केवळ नावावर किंवा परंपरेवर विश्वास ठेवत नाही. कामगिरी, संपर्क आणि उत्तरदायित्व या तीन गोष्टींचा हिशेब तो मागतो. चार दशकांची पकड एका निवडणुकीत सैल झाली. आवाज मोठा नव्हता; पण संदेश ठाम होता. कोयनात झालेला हा सत्ताबदल केवळ राजकीय घटना नाही; तो इशारा आहे. आता आत्मचिंतन हा पर्याय नसून अपरिहार्यता आहे.