Satara News : भाषेवरून समाजात दुही पसरवण्याचा प्रयत्न : मंत्री मंगलप्रभात लोढा

कराड : मुंबईसह राज्यात भाषेवरून दुही पसरवण्याचे काम सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, हे केले जात आहे. हा प्रकार केवळ राजकारणासाठी असल्याने, लोकच त्याला उत्तर देतील. सरकारला यात काहीच करायची गरज नाही, असे सांगत राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला.
मंत्री लोढा यांनी बुधवारी कराड येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले व आमदार मनोज घोरपडे उपस्थित होते.
लोढा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेचा गौरव केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मराठी व हिंदी भाषेच्या विषयावरून समाजात दुही पसरवण्याचा प्रयत्न करणार्यांना समाजच उत्तर देईल.
मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक मंत्र्यावर प्रत्येकी दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. मंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला या जिल्ह्यांमध्ये जाऊन, कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर लोढा यांनी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या घरी भेट दिली. खाशाबा जाधव यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात 1952 साली कुस्तीत कांस्यपदक मिळवून दिले होते. या घटनेला बुधवारी 73 वर्षे झाली. या पार्श्वभूमीवर लोढा यांनी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.



