Satara News : साताऱ्यातील सातही पर्यटक सुखरूप; दहशतवादी हल्ल्यावेळी होते ‘गुलमर्गमध्ये’

सातारा : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याने पर्यटकांचे कुटुंबीय आणि नातेवाईक चिंतेत आहेत. सातारा जिल्ह्यातील ७ जण पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला गेले होते. सुदैवाने, हल्ल्यावेळी ते पहलगामपासून १०० किलोमीटर दूर गुलमर्ग येथे होते, त्यामुळे सर्वजण सुरक्षित आहेत. ते सातारा जिल्हा प्रशासन आणि कुटुंबीयांच्या संपर्कात असून, दोन दिवसांत घरी परतणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पर्यटकांमध्ये कराड येथील माधवी मिलिंद कुलकर्णी, त्यांचा मुलगा महेश कुलकर्णी, नातेवाईक श्रीधर शामराव क्षीरसागर, वर्षा श्रीधर क्षीरसागर, सुखदा श्रीधर क्षीरसागर, तसेच सातारा येथील शरद हरिभाऊ पवार आणि त्यांच्या पत्नी विद्या शरद पवार यांचा समावेश आहे. महेश कुलकर्णी हे इंटेरियर डिझायनर असून, शरद पवार हे एसटी महामंडळाचे निवृत्त कर्मचारी आहेत. सध्या सर्वजण श्रीनगरमधील हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत.
महेश कुलकर्णी म्हणाले, “हल्ल्यावेळी आम्ही गुलमर्ग येथे होतो. स्थानिक वृत्तवाहिनीच्या बातमीतून हल्ल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांचे फोन आणि मेसेज येऊ लागले. त्यामुळे हल्ल्याचे गांभीर्य समजले.” हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, नाकाबंदी, गस्त आणि संशयितांची तपासणी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
या हल्ल्यात हरियाणातील करनाल येथील नौदल लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांचे आठवड्यापूर्वीच लग्न झाले होते. हे नवविवाहित दाम्पत्य आणि साताऱ्याचे पर्यटक श्रीनगरमधील ‘लक्झरी इन’ हॉटेलमध्ये थांबले होते. बुधवारी सकाळी लष्करी जवानांनी हॉटेलमध्ये येऊन नरवाल दाम्पत्याबाबत माहिती घेतल्याचे महेश कुलकर्णी यांनी नमूद केले.





