Satara News : कोयना धरणावर देशप्रेमाचा जल्लोषात रंगला अद्वितीय सोहळा

कोयनानगर : स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून कोयना धरणावर बुधवारी सायंकाळी देशप्रेमाचा अद्वितीय सोहळा रंगला. तिरंगी प्रकाशाच्या झळाळीत, पाण्याच्या प्रचंड धबधब्याच्या गजरात, देशभक्तीची गाणी गुंजली आणि उपस्थितांचे हृदय अभिमानाने भरून आले. लेझर शोच्या निमित्ताने धरणाचे सहा वक्र दरवाजे एकाचवेळी उघडून 2,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला.
दरवाजांतून कोसळणारे पाणी, त्यावर पडणारे हिरवे, केशरी, पांढरे किरण आणि पाण्याच्या तुषारांत नाचणारे प्रकाशचित्र ही नजर खिळवून ठेवणारी जादू अनुभवण्यासाठी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी धरण परिसर गजबजून गेला. शोदरम्यान भारताचा तिरंगा, स्वातंत्र्यवीरांच्या शौर्यगाथा आणि सैनिकांच्या पराक्रमाचे चित्रण आकाशात व पाण्याच्या पडद्यावर झळकले.
‘वंदे मातरम्’, ‘जन गण मन’च्या स्वरांतून संपूर्ण परिसर भारावून गेला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ टिपून ते कायमस्वरूपी जतन केले. या सोहळ्यामुळे कोयना धरण परिसरात पर्यटनाची आणखी एक आकर्षक ओळख निर्माण झाली असून, पावसाळ्यातील पाण्याच्या साठ्याबरोबरच स्वातंत्र्याचा उत्सव लोकांच्या मनात कायमचा कोरला गेला.





