Satara News : कोयनानगरात विकासाचा ‘3 टप्प्यांचा कार्यक्रम’ – घर, हरितीकरण आणि महिलांचा सन्मान

कोयनानगर : गोकुळ तर्फ हेळवाक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर 68 घरकुलांपैकी दोन घरकुलांची यशस्वी उभारणी पूर्ण झाली आहे. या घरांचे गृहप्रवेश सोहळे नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमास गटविकास अधिकारी सरिता पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
गृहप्रवेशानंतर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून परिसराला हरिततेचा स्पर्श देण्यात आला. पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून ग्रामस्थांच्या सहभागातून विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.”घरकुलाच्या उभारणीबरोबरच हिरवळ वाढवणे ही काळाची गरज आहे,” असे सरिता पवार यांनी यावेळी सांगितले.
तिसऱ्या टप्प्यात, महिला बचत गट व घरकुल लाभार्थी महिलांना सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. “बचत गट हे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्वाचे माध्यम आहे. महिलांनी उद्यमशीलतेकडे वळून आत्मनिर्भर व्हावे,” असे आवाहन सरिता पवार यांनी केले.
कार्यक्रमास सरपंच चंदा कदम, उपसरपंच वंदना मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सविता कदम, सुनीता कदम, विस्तार अधिकारी संदीप कुंभार, ग्रामसेवक नितीन पाटील, महादेव येडगे, अजय देसाई, शैला मोहळकर, बाळासाहेब पाटणकर, माजी सरपंच शैलेंद्र शेलार, सत्यजीत शेलार, लहुराज कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
“गृहप्रवेश, हरित उपक्रम व महिला सक्षमीकरण अशा तीन टप्प्यांतून कोयनानगरमध्ये विकासाचा ठोस पाया रचला जात आहे,” असे मत उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.





