Satara : नेर तलाव आणि माझं जीवाभावाचं नातं

सातारा : दुष्काळमुक्तीची लढाई तसेच पाणी आणि जयकुमार गोरे हा वेगळा विषय असूच शकत नाही. माण-खटावला पाणी देण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका नेर तलावाची आहे. त्यामुळे नेर तलाव आणि माझं जीवाभावाचं नातं आहे. नेर तलाव परिसर आणि येथील राघवचैतन्य मंदिरासाठी ग्रामविकास खात्याच्या कक्षेत बसतील ती विकास कामे निश्चित करु, असा शब्द ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
फडतरवाडी (नेर तलाव, ता. खटाव) येथे संत तुकाराम महाराज यांच्या गुरुपरंपरेतील थोर संत श्री राघवचैतन्य महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित ‘श्री राघवचैतन्य भूषण’ पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा सुनिताराजे पवार, माजी जि. प. सदस्या वैशालीताई फडतरे, माजी जि.प. सदस्य मानाजी घाडगे, किरण बर्गे, राजेंद्र पाटील, महेश पवार, राहुल फडतरे, बापू जाधव यांच्यासह भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. गोरे पुढे म्हणाले, संत महंतांचे आशीर्वाद पाठीशी असणे काळाची गरज आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन अध्यात्माची कास धरत सर्वजण एकत्र आले तर महाराष्ट्र विकासात एक नंबर होईल. दरम्यान, अमरावती विभागाचे धर्मादाय उपायुक्त नवनाथ वामनराव जगताप, हभप गुरुवर्य विठ्ठलस्वामी महाराज वडगावकर आणि हभप गुरुवर्य दादा महाराज गोरेगावकर या आदर्श व्यक्तिमत्त्वांना ‘श्री राघवचैतन्य भूषण’ प्रदान करण्यात आला. परिसरातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बाल महोत्सवात चिमुकल्यांनी विविध कलाविष्कार सादर केले.
ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी प्रास्ताविक केले. अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सातारा जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष के. आर. फडतरे यांनी आभार मानले.





