पुसेगाव – संपत गुलाब सत्रे (वय 55, रा. दरजाई, ता. खटाव) हे मंगळवारी (दि. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेतातून पाऊलवाटेने घरी परतत असताना अज्ञाताने त्यांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संपत सत्रे हे काल सायंकाळी शेतात कामासाठी गेले होते. ते सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी परतत असताना पाऊलवाटेवर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात व डाव्या कानावर हत्याराने वार केले. या हल्ल्यात संपत सत्रे यांचा मृत्यू झाला.
याबाबतची त्यांची पत्नी नीलम सत्रे यांनी दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके तपास करत आहेत. कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी घटनास्थळी भेट दिली.
सातारा येथून श्वानपथकही बोलावण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी विविध ठिकाणी पथके पाठविण्यात आली आहेत.