सातारा नगरपालिकेच्या तिजोरीला मंदीची झळ 

बागा, व्यापारी संकुलांवर बगलबच्चांचा ताबा

शाहू कला मंदिराचा अपवाद वगळता पालिकेच्या सार्वजनिक बागा, क्रीडांगणे व व्यापारी संकुले माजी खासदारांच्या बगलबच्चांनी वाटून घेतल्याने पालिकेची तिजोरी उत्पन्नाअभावी ओस पडली आहे. पालिकेच्या मुख्य कार्यालय संकुलातील मंगल कार्यालयाचा करार संपूनही एका माजी नगरसेवकाच्याच ताब्यात ते कार्यालय आहे. अल्प वार्षिक भाडे देऊनच पालिकेला गुंडाळले जात आहे.

सातारा  – माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे अनुदान घोषणेचे “अच्छे दिन’ आले तरी सातारा पालिकेला मात्र “बुरे दिन’ आल्याचे चित्र आहे. पालिकेचा आटलेला सर्वसाधारण निधी, त्रुटींच्या चक्रव्युहात अडकलेले अंदाजपत्रक, घरपट्टी वसुलीची अपुरी उद्दिष्टपूर्ती यामुळे पालिकेची अर्थव्यवस्था सलाईनवर आहे. सानुग्रह अनुदान आचारसंहितेत अडकण्याची शक्‍यता आहे.

चतुर्थ वार्षिक पाहणीशिवाय जुन्याच दराने घरपट्टीची वाटली गेलेली बिले आणि वसुलीत झालेली 15 टक्‍क्‍यांची घट यामुळे पालिकेची आवक कमालीची मंदावली आहे. दिवाळीच्या सानुग्रह अनुदानासाठी पालिकेला राखीव वेतन निधीची पोतडी उघडण्याची वेळ येणार आहे. मात्र, रस्त्यांसाठी पन्नास कोटी निधीच्या घोषणेमुळे खुशीत मश्‍गुल असलेले सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी या आर्थिक मंदीकडे गांभीर्याने लक्ष देईनासे झाले आहेत. संकलित कराची वसुली 15 टक्‍केच झाल्याने सातारा पालिकेची मोठी आर्थिक कोंडी झाल्याचे समजते. लेखा विभागात दबक्‍या पावलाने येत असलेली मंदी आणि डे बुकच्या अधिग्रहणाचा घोळ यामुळे खर्चाची तोंडमिळवणी करताना पालिका प्रशासनाची दमछाक होत असल्याची चर्चा आहे.

पाणीपुरवठा, वीज बिल, घंटेवारी, दैनंदिन आस्थापना या सगळ्यांवरील मासिक खर्च पन्नास लाखापेक्षा अधिक आहे. सर्वसाधारण निधी आटल्याने ठेकेदारांच्या बिले अदा करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. वार्षिक भाडे अंदाजाची टाळाटाळ करण्यामागे मलिद्याची गणिते बाहेर पडण्याची भीती आहे. त्यामुळेच पालिकेच्या व्यापारी संकुलांमधील गाळा भाडे वसुलीच्या संदर्भात महिला कर्मचाऱ्याची बदली करून मर्जीतल्या “खटावकरां’ची वर्णी लावण्यात आली. घरपट्टीच्या बिलांच्या उशिरा वाटपातील विलंबाने घोळ झाला आहे. करवसुलीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. सध्या शहरात चौतीस हजार मिळकती असूनही महसूल वीस कोटीच्या वर गेलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)