Satara Municipal Council – बुधवार पेठ सर्वे नं. १७४ येथील टंगसाळे वखार प्रकरणामुळे सातारा नगरपालिकेच्या स्थावर जिंदगी विभागातील गंभीर अनागोंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. संबंधित जागेचे मूळ करारनामे, भाडे तपशील, क्षेत्रफळाची नोंद आणि मुदतवाढीची माहितीच पालिकेकडे उपलब्ध नसल्याची जोरदार चर्चा सुरू असून त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिकेच्या मालकीच्या सुमारे सहाशे भूखंड व भाडे तत्वावरील मिळकतींची माहिती आजही विस्कळीत अवस्थेत असल्याचे समोर येत आहे. या सर्व मिळकतींवरील थकबाकी तब्बल आठ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, अनेक प्रकरणांमध्ये भाडे निर्धारणाची प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडलेली आहे. स्थावर जिंदगी विभागाकडे २७६ व्यापारी गाळ्यांची नोंद असली तरी प्रत्यक्ष महसूल व वसुली यामध्ये मोठी तफावत असल्याची चर्चा आहे. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी शहरातील सर्व स्थावर मिळकतींचा मुळातून अभ्यास करण्याची आवश्यकता व्यक्त केली असली तरी प्रत्यक्षात टंगसाळे वखार प्रकरणात पालिकेची भूमिका बोटचेपी असल्याचे आरोप होत आहेत. शंभर वर्षांपूर्वी जागा भाड्याने दिल्याचा दावा केला जात असताना संबंधित वखार मालकाकडून मूळ करारनामा, भाडेपावत्या आणि क्षेत्रफळाचे पुरावे मागवण्यात पालिका अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. याच प्रकरणात सुरुवातीला कारवाईसाठी गेलेले अधिकारी वखारीतून चहा पिऊन परतल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र प्रसारमाध्यमांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने अचानक वखार सील करण्याची भूमिका घेतल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. वखार सील करण्यासाठी नेमका कायदेशीर आधार कोणता, करारातील अटी काय होत्या आणि संबंधित जागेचे क्षेत्र किती होते, याचे उत्तर मात्र प्रशासनाकडे नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, मुख्याधिकारी जळक यांचे नाव आर्थिक हितसंबंधातून पुढे आल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्याने वखार मालक गोकुळ टंगसाळे यांनी माफीनामा जाहीर केला आहे. “हम साब को हप्ता देता है” अशी वादग्रस्त बाईट देणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणाशी मुख्याधिकाऱ्यांचा कोणताही संबंध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पालिकेच्या मालकीच्या अनेक जागा जुना मोटार स्टँड परिसरात वर्षानुवर्षे अतिक्रमण व संशयास्पद ताब्यात असल्याचे बोलले जाते. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे कोणताही अधिकारी कठोर कारवाई करण्यास धजावत नसल्याची टीका होत आहे. टंगसाळे वखार प्रकरणातही एका माजी नगरसेवकाच्या हस्तक्षेपाची जोरदार चर्चा सुरू आहे. सातारा नगरपालिकेने सर्व भूखंडांचे सातबारे, करारनामे, भाडे नोंदी आणि मुदत संपलेल्या जागांची माहिती डिजिटल स्वरूपात अद्ययावत करून महसूल वाढीसाठी कठोर धोरण राबवण्याची गरज व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या प्रकरणात निर्णायक भूमिका घेऊन स्थावर जिंदगी विभागाचा संपूर्ण लेखाजोखा सार्वजनिक करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आठ कोटींची थकबाकी; नोंदींचाच गोंधळ पालिकेच्या स्थावर जिंदगी विभागाकडे सुमारे ६०० भूखंड आणि २७६ व्यापारी गाळ्यांची नोंद आहे. मात्र अनेक जागांचे करारनामे, भाडे तपशील आणि मुदतवाढीच्या नोंदीच उपलब्ध नसल्याने महसूल वसुलीवर मोठा परिणाम होत असल्याचे समोर येत आहे.