Satara Municipal Budget – शहराच्या विकास कामांना दिशा देणारे सातारा शहराचे सहाशे कोटींचे बजेट स्थायी समितीसह विषय समिती सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर नसल्याने थेट चर्चेला सर्वसाधारण सभेपुढेच येणार आहे. सभापती निवडीचा कच्चा अजेंडा तयार करण्यात आला आहे. अद्याप याबाबतची नक्की तारीख येत्या चार दिवसात जाहीर करण्यात येईल, असा अंदाज आहे. बजेटमध्ये शहरातील विविध विकास कामांसाठी करावयाच्या तरतुदी, भांडवली जमा, महसुली जमा, त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी यांचा स्वतंत्र ताळेबंद तसेच शिक्षण मंडळाचे स्वतंत्र बजेट, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजना यांंची स्वतंत्र मांडणी उपनगराध्यक्षांना करावी लागणार आहे. गतवर्षीचे बजेट हे 645 कोटी रुपयांचे होते. 2026 -27 चे सातारा शहराचे बजेट हे काटकसरीचे असल्याने हे साधारण सहाशे ते सव्वा सहाशे या दरम्यान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिलकीचे आणि काटकसरीचे हे बजेट तब्बल नऊ वर्षानंतर सर्वसाधारण सभेपुढे येणार असल्याने त्याचा अभ्यास सर्व नगरसेवकांना करावा लागणार आहे. साधारणत: एक फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेकडे हस्तांतरित होताना तत्पूर्वी प्रशासन आणि स्थायी समिती यांच्या समन्वयाने सातारा शहराच्या अंदाजपत्रकाचा आराखडा तयार करण्यात आलेला असतो. उदयनराजे भोसले- शिवेंद्रसिंहराजे भोसले दरवर्षी शिल्लक साडेचार लाख रुपये दाखवून महसुली खर्च आणि जमा यांचा समन्वय लेखा विभागाला साधावा लागतो. यंदा हद्दवाढ जाहीर झाल्यानंतरची ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने यंदाच्या बजेटमध्ये हद्दवाढ भागासाठी काय बोनस मिळणार, याची सातारकरांना उत्सुकता आहे. विषय समित्या आणि सभापती निवडीसाठी सभेची प्रतीक्षा पालिकेमध्ये नियोजन, आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, आणि गरजेनुसार मागासवर्गीय विशेष समाज कल्याण सभापती निवडी केल्या जातात. या निवडी संदर्भातील सर्वसाधारण सभा अद्याप जाहीर झालेली नाही. सभा सचिवांच्या माध्यमातून सभापती निवडीचा कच्चा अजेंडा नगराध्यक्षांच्या अवलोकनार्थ सादर झालेला आहे. त्यामुळे येत्या 3 अथवा 4 फेब्रुवारी रोजी सभापती निवडी ची सभा बोलावली जाईल, असा अंदाज आहे. भारतीय जनता पक्षाच्या 41 सभासदांमधून सहा अनुभवी आणि नवीन चेहरे असा समन्वय साधावा लागणार आहे. खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजांच्या चर्चेनंतर यादी अंतिम होऊन या निवडी केल्या जातील. त्यासाठी इच्छुक नगरसेवकांनी आपापल्या नेत्याकडे मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.