सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ वहिनी यांच्या ९५ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक शाखांच्यावतीने शनिवार, दि. २९ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता धनिणीच्या बागेतील श्री. छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस शाखा नंबर १ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
रयत शिक्षण संस्थेला १०५ वर्षाहून जास्त वर्षे होत आहेत, रयतची खरी पायाभरणी धनिणीचे बागेतच झाली. समता, बंधुभाव, जपणारे असे कष्टकरी लहान विद्यार्थ्यांचे ते गुरुकुल होते. स्वावलंबी शिक्षणाचे संस्कार इथेच झाले. छत्रपती शाहू बोर्डिंग हीच खरी रयत शिक्षण संस्थेची गंगोत्री आहे. सौ. लक्ष्मीबाई पाटील उर्फ वहिनी यांच्या समर्पित कार्याचे स्मरण करून त्यातून प्रेरणा घेण्यासाठी दरवर्षी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यावर्षी धनिणीच्या बागेत होणारा हा पुण्यतिथी कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रयत संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते, थोर देणगीदार रामशेठ ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.
संस्थेच्या विविध अधिकार मंडळातील सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, संस्थेचे थोर देणगीदार, सातारा येथील रयतच्या शैक्षणिक संकुलातील सर्व शाखाप्रमुख, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.