Satara : बोराटवाडीत मंत्री जयकुमार गोरे यांचा रोज जनता दरबार

सातारा : ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी, ता. माण येथील निवासस्थानी आठवड्यातील तीन ते चार दिवस जनता दरबार भरत आहे. या दरबारात ना. गोरे हे माण-खटाव मतदारसंघासह राज्यातील अधिकारी, कर्मचारी आणि हजारो नागरिकांच्या कामांचा आणि तक्रारींचा निपटारा करत आहेत. या जनता दरबारामुळे बोराटवाडीचे राज्याच्या नकाशावरील स्थान अधोरेखित झाले आहे.
ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाकडून जिल्हा परिषदांमध्ये राबवण्यात येणार्या योजना, प्रशासकीय बाबी, पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना, मोदी आवास, रमाई आवास, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामपंचायतींचा विकास आराखडा, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान, रस्ते, पूल, ग्रामसचिवालये, तीर्थक्षेत्रे विकास, प्रशासकीय इमारती बांधकामे, सौरऊर्जा ग्राम, आपले सरकार सेवा केंद्र, यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान, आषाढीवारी पालखी सोहळा, महाआवास, आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार आदी योजनांसह जनतेशी निगडीत अभियाने राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने सर्व प्रकारची कामे आणि अडचणी घेऊन रोज हजारो नागरिक बोराटवाडीत येत आहेत. राज्यातील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठीही अनेक शिक्षक आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होत आहेत.
मंत्री गोर यांनी गेल्या डिसेंबरपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना भेटी देऊन, तेथील कामकाजाचा आढावा घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अधिकार्यांना कामांचे उद्दिष्ट दिले आहे. त्या अनुषंगाने अनेक अधिकारी कामकाजाचा आढावा देण्यासाठी बोराटवाडीला येत आहेत. मतदारसंघातील जनता शासकीय कामांबरोबर गावोगावच्या कामांसंदर्भात या जनता दरबारात येत आहे. बहुतांश कामे आणि तक्रारींवर लगेचच निर्णय घेतला जात असल्याने जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मंत्री गोरे हे सकाळी 7.30 पासून रात्री 10 किंवा 11 वाजेपर्यंत सर्व अभ्यागतांच्या कामांचा निपटारा करत असल्याने हा जनता दरबार चर्चेत आला आहे.
एकाच हेलपाट्यात काम करण्यास प्राधान्य
मतदारसंघासह इतर जिल्ह्यातील अनेक अभ्यागतांना त्यांच्या कामांसाठी मुंबईला हेलपाटे मारणे जिकिरीचे ठरते. वेळ आणि पैसा खर्च होतो. मात्र, बोराटवाडीतून कामे झाल्यास लोकांना मुंबईला हेलपाटे मारावे लागणार नाहीत. काही अभ्यागतांच्या अडचणी अधिकार्यांशी फोनवरून संपर्क करून, तात्काळ सोडवल्या जात आहेत. जनता दरबारात विकासकामांची अपेक्षा घेऊन येणार्यांना जागेवरच न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्रालय, मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्याला पुरेसा वेळ देताना रविवारीही काम करत असल्याने जनतेची मोठ्या प्रमाणावर कामे मार्गी लागत असल्याचे ना. गोरे यांनी सांगितले.





