Satara : म्हसवड- पुणे- नाशिक बसचा शुभारंभ

म्हसवड : दहिवडी आगाराने म्हसवड- पुणे- नाशिक ही सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी बस म्हसवड बसस्थानकातून आजपासून सुरू केली आहे.
सर्वसामान्य प्रवाशांची सोय व्हावी यासाठी दहिवडी आगाराने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी निवेदनाद्वारे दहिवडी आगाराकडे केली होती. या पार्श्वभूमीवरही बस सुरु झाली आहे. दहिवडी आगाराला सर्वाधिक आर्थिक उत्पन्न म्हसवड बस स्थानकातून मिळते. तर म्हसवड व परिसरातील नागरिक व्यवसायानिमित्त राज्यभरात ये- जा करीत असतात, या बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या एस. टी. बसेस कमी असल्याने प्रवाशांना येथून प्रवास करताना फार अडचणी येत आहेत.
कुटुंबासह टप्प्याटप्याने प्रवास करणे हे फार जिकीरीचे असल्याने अनेक प्रवाशांनी एस. टी. कडे पाठ फिरवली आहे. हे चित्र बदलण्यासाठी व एस. टी. चे बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे बिरुद प्रवाशांच्या मनात पुन्हा बिंबवण्यासाठी दहिवडी आगाराने पुढाकार घेतल्यास आगाराला उत्पन्न तर वाढणारच आहे, याशिवाय प्रवाशांची होत असलेली गैरसोय थांबणार आहे. म्हसवड- नाशिक बसचा नोकरदारांना चांगला फायदा होणार आहे. कारण ही बस सकाळी सव्वापाच वाजता म्हसवड बस स्थानकातून सुटणार आहे. ती दहिवडी, फलटणमार्गे पुणे स्वारगेट येथे सकाळी साडेनऊ वाजता ऑफिस वेळेपूर्वी पोहचणार आहे.
त्यामुळे प्रवाशांना ही बस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ही बस पुढे नाशिकला रवाना होऊन दुपारी दोन वाजता पोहचेल तर ही बस सकाळी ७ वाजता नाशिकहून सुटेल. ती दुपारी १ वाजता स्वारगेटला पोहचेल तर दुपारी ४ वाजता म्हसवडला पोहचेल. म्हसवड बसस्थानकातून सुटणाऱ्या नवीन बसचा शुभारंभ म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाहतूक नियंत्रक कोळी, संजय टाकणे, अभिराज नागमल, बाळू थोटे, बसचे चालक व वाहक यांच्यासह प्रवासी उपस्थित होते





