सातारा : मराठा समाज ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवणारच

मनोज जरांगे-पाटील; शांततेत लढा देऊन आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही
वाई – गेल्या 70 वर्षांपासून मराठा समाजाला चारही बाजुने वेढा पडला आहे. त्यातून सुटका करण्यासाठी समाज एकवटला आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा समाज ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळविणारच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी येथील झालेल्या जाहीर सभेत दिला. ओबीसीतून सरकसट आरक्षण द्यावे लागेल, अन्यथा आता सरकारला सुट्टी नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येथील श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी चौकात सभा झाली. सभेला मोठी गर्दी झाली होती. यावेळी जरांगे यांनी सरकार, नेते यांच्यावर टीकेची झोड उठवली.
जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजाला दोन अंग आहेत, त्यामध्ये क्षत्रिय व शेती करणारे मराठे आहेत. त्यामुळे दुसऱ्याचे पोट भरणे व लढणे या गोष्टी मराठ्यांना चांगल्या माहित आहे. गेल्या 70 वर्षांपासून समाजाला आरक्षण नाकारण्यात आले. विविध आयोग नेमले, त्यांनीही पुरावा नाही म्हणून आरक्षण नाकारले. आरक्षण मिळू नये म्हणून षढयंत्र रचण्यात आले. आता मराठा समाज एकवटल्यानंतर लाखाने पुरावे पुढे येत आहेत. सत्तर वर्षांपूर्वी आरक्षण मिळाले असते तर समाज प्रगत झाला असता. आता नेत्यांना आपणच मोठे करून चूक केली आहे. सर्वपक्षीय नेत्यांना आपणच मोठे केले आहे. त्यांचे बंगले झाले, गाड्या आल्या. त्यांची मुले परदेशात शिकून आल्यानंतर आपणच त्यांना भैय्या म्हणून त्यांच्या मागे लागतो. ही आपण मोठी चूक केली.
ते आरक्षणासाठी आपल्या मदतीला येणार नाहीत. मराठा आरक्षणाचा लढा आपणालाच लढावा लागेल. आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आहे. आता विजयाचा दिवस जवळ जवळ येत आहे. त्याला गालबोट लागू नये, याची काळजी घ्या. मराठा एकत्र येत असल्याने काही कळप तयार होत आहेत. शांततेत आंदोलन करा. काहींचा जातीय दंगली करण्याचा डाव आहेत. पुढच्या काळात ज्यांना आरक्षण मिळाले आहे, व ज्यांना मिळाले नाही त्या दोघांनीही एकत्र रहावे. जातीला वेढा पडू देऊ नका. मराठा समाजावरमोठ संकट आहे, तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे तरच मराठ्यांची घर सुधारतील. लेकरांचे कल्याण करण्यासाठी एकत्र रहा.
वाईत आल्यानंतर जरांगे-पाटील यांनी श्री महागणपतीचे दर्शन घेऊन पूजन केले. सभास्थळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सकल मराठा समितीच्या कार्यालयाचे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. व्यासपीठावर आल्यानंतर श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सराटी या गावातून आलेले शाहिर अरविंद घोगरे यांनी “मराठा आरक्षण दशा व दिक्षा’ हा पोवाडा सादर केला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती बाबर यांच्या हस्ते मनोज जरांगे-पाटील यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ, महागणपतीची प्रतिमा, तलवार, बैलगाडीची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला. गणेश घागरे यांनी स्वत:च्या रक्ताने मनोज जरांगे पाटील यांचा काढलेला फोटो भेट दिला.अनिल सावंत यांनी आभार मानले. नितीन कदम यांनी सुत्रसंचलन केले. मराठा समन्वयाकांनी कार्यक्रमासाठी आलेल्या मराठा बांधवांसाठी पार्किंग, पिण्याची पाणी, बसण्याची सोय तसेच वाहतुक सुरळीत राहण्यासाठी तसेच सभा यशस्वितेसाठी प्रयत्न केले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला.
राजकीय पक्षाच्या नेत्यांना इशारा
वाईच्या या न्यायाच्या भूमीतून मी पहिल्यांदाच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना आवाहन करतो आहे, या मराठ्यांच्या आरक्षणासाठी लेकराबाळांच्या पाठीशी उभे रहावे. तुम्ही जर मागे उभे राहिलात तर तुमचे उपकार विसरणार नाही. जर उभे राहिला नाही, तर कधीच माफ करणार नाही. आपल्या मुला-बाळांसाठी आरक्षण आवश्यक आहे. ते मिळाल्याशिवाय समाज गप्प बसणार नाही. त्याची दखल घेऊन सरकारने आरक्षण द्यावे. महिलांनी गावागावात जाऊत आरक्षणाची जनजागृती करणे गरजेचे आहे.





