Satara : जगाशी स्पर्धा करणारा माण-खटाव बनवणार

दहिवडी : ज्यावेळी बारामती, कोल्हापूरमधील मुलींच्या आई-वडिलांकडून माझ्या माण-खटावच्या मायमाउलीला विचारले जाईल की, माझ्या मुलीशी तुमच्या मुलाचं लग्न कराल का? त्यावेळी माझे काम संपेल. येथील दुष्काळी परिस्थिती पूर्णपणे संपेल तेव्हा माझं काम संपेल. आता जगाशी स्पर्धा करणारा माण-खटाव बनवायचा आहे, असे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल ना. गोरे यांचा आंधळी (ता. माण) येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सौ. सोनिया गोरे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, डी. एस. काळे, अर्जुन काळे, अरुण गोरे, शिवाजीराव शिंदे, गणेश सत्रे, संजय गांधी, किसन सस्ते, बलवंत पाटील, बाळासाहेब कदम, सिद्धार्थ गुंडगे, हरिभाऊ जगदाळे, विशाल बागल, मीनाक्षी काळे, मनीषा काळे, गुलाब उगलमोगले, सोमनाथ भोसले, प्रा. राजेंद्र जगदाळे उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, मी या मातीतून मोठा झालो आहे. तुम्ही ते लोक आहात, ज्यांनी माझे राजकारण उभे केले. जातीपातीच्या मतभेदांपलीकडे जाऊन, लोकांनी विकास आणि माणुसकीसोबत राहून मला मतदान केले आहे. त्यामुळे मी कितीही मोठा झालो, तरी आपल्यात अंतर पडणार नाही. मंत्रिपदाची हवा माझ्या डोक्यात जाणार नाही. तुम्ही काळजी करू नका. माणसे नेहमी सत्तेसोबत असतात; परंतु तुमची ही गर्दी कायम माझ्यासोबत आहे.
प्रत्येक निवडणुकीत संघर्ष माझ्या पाचवीला पुजला आहे. यावेळी विरोधकांनी मला वडिलांचे अस्थिविसर्जनसुद्धा करू दिले नाही. लगेचच षडयंत्रे सुरू झाली. मी आमदार, मंत्री होऊ नये, म्हणून नदीच्या काठावर पूजा करण्यात आल्या. मंत्री झाल्यावर पण पूजा केल्या. आपल्या मातीतला मंत्री झालाय, म्हटल्यावर आनंद होईल, असे वाटले; परंतु तसे झाले नाही. मात्र, माझ्या पाठीशी माझ्या जनतेचा, मायमाउलींचा आशीर्वाद कायम आहे.
डॉ. येळगावकर म्हणाले, जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रिपद मिळाल्यावर बारामतीकरांचा जळफळाट झाला. म्हणून त्यांच्यावर बालंट आणण्याचा प्रयत्न केला गेला; पण जयकुमार गोरे यांनी असा डाव टाकला की, सर्व विरोधकांना धोबीपछाड मिळाली. आम्ही छातीचा कोट करून, ना. गोरे यांच्या पाठीशी उभे राहू. अर्जुन काळे, डी. एस. काळे यांची भाषणे झाली. लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांनी प्रास्ताविक केले.
आंधळीसाठी निधी देणार
आंधळीकरांनी मागितले अन् मी दिले नाही, असे कधी झाले नाही. श्री महालक्ष्मी मंदिरासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय पूर्ण होईपर्यंत एक रुपयाचा निधी कमी पडणार नाही. नदीवरील पूल व इतर रस्त्यांसाठी निधी देण्यात येईल, असे आश्वासन ना. गोरे यांनी दिले.





