Satara : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यात 25 कोटी रुपये थकले

सातारा : सर्वसामान्यांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना सरकारच्या अनुदानाभावी अडचणीत आली आहे. राज्यात या योजनेचे अनुदान थकित आहे त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून आरोग्य देयकांना विलंब होत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये या योजने चे २५ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे येथील रुग्णांचा मोफत उपचार सलाईनवर आला आहे. आरोग्य विभागाच्या समन्वयकांनी मात्र तांत्रिक अडचणीचे कारण हे मंत्रालय स्तरावर बैठक झाली नसल्याने अनुदान थकल्याचे सांगितले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतर्गत या प्रकरणातील 118 प्रस्ताव अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून त्याचा फटका इतर अनेक योजनांना बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाच्या अनुदानासह थेट महात्मा फुले जन आरोग्य योजनेला सुद्धा अडचण झाली आहे. जनआरोग्य योजनेचे तब्बल 889 कोटी रुपये थकले आहे. याबाबत मंत्रालय स्तरावर वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बैठक झाली असून केवळ तांत्रिक कारणास्तव हे अनुदान रखडल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
त्याबाबत वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बैठक झाल्याची कक्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या योजनेचे अनुदान थकल्याने अनेक प्रस्ताव रखडून पडले आहे.
महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याची 90 कोटी तर कोल्हापूर जिल्ह्याची 52 कोटी रुपये थकबाकी आहे. सातारा जिल्ह्यातील रुग्णांना तातडीने याबाबतचा दिलासा मंत्रालय स्तरावरून दिला जावा अशी मागणी आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या अनुदानावर लक्ष केंद्रित झाल्याने इतर योजनांना त्याचा फटका बसल्याचे शासकीय अधिकारी खाजगीमध्ये सांगत आहेत.
तीन-चार दिवसात अनुदान जमा होईल
सातारा जिल्ह्यामध्ये या अनुदानाची थकबाकी 25 कोटी रुपये आहे. या योजनेच्या माध्यमातून उपचार घेणारे जिल्ह्यातील रुग्ण अडचणीत आले आहेत. 118 प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे. मात्र, सूत्रांनी त्याला देण्यास असमर्थता दर्शवली आहे. जिल्हा समन्वयकांच्या माध्यमातून याबाबत माहिती देताना मंत्रालयाकडे बोट दाखवले जात आहे. येत्या तीन-चार दिवसात हे अनुदान तात्काळ जमा होईल, त्यामुळे प्रलंबित प्रस्तावधारकांनी अजिबात काळजी करू नये, असे आवाहन जिल्हा डॉक्टर युवराज करपे यांनी केले आहे





