Satara : महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे मुंबईत अनावरण

कोयनानगर/महाबळेश्वर : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 4 मे या कालावधीत महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुख्य लेखा वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 2 मे रोजी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला, संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी, हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
या महोत्सवात स्थानिक लोकसंस्कृतीचा समावेश असलेले कार्यक्रम आणि नामांकित कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गडकिल्ले दर्शन व इतर पर्यटनस्थळे दर्शन सहलीचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीचे तंबू निवास उभारण्यात येणार आहेत. पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, जलक्रीडा, ट्रेकिंंग, रॉक क्लायम्बिंग, घोडेस्वारी आदी साहसी उपक्रम, स्थानिक बचत गटांच्या हस्तकलांचे प्रदर्शन व विक्री दालन, स्थानिक पाककलाकृती व खाद्य महोत्सव दालन, महाबळेश्वर येथील प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात विविध राज्यांमधील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
महाबळेश्वर हे जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीचे उन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ, सुंदर बागा आणि नयनरम्य दृश्ये पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटिशकाळातील असंख्य वास्तू गतस्मृतींची आठवण करुन देतात. हे ठिकाण स्ट्रॉबेरीव्यतिरिक्त असंख्य नद्या, भव्य कॅस्केड, शिखरे, प्राचीन मंदिरे, बोर्डिंग स्कूल, घनदाट जंगल, धबधबे, टेकड्या व दर्यांसाठी प्रसिद्ध आहे. महोत्सव कालावधीत 50 निवासी टेंट उपलब्ध होणार आहेत. स्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल.





