सातारा: राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार

खंडाळा कारखाना निवडणूक; शेतकरी हितासाठी ताकदीने लढण्यासाठी आमदार गट सज्ज
खंडाळा – शेतकरी हितासाठी खंडाळा कारखाना निवडणूक ताकदीने लढविणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले. त्याप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयारी पूर्ण केली असून आज झालेल्या बैठकीत संभाव्य उमेदवारीची यादी समोर आली आहे.
खंडाळा तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्वाचा भाग असलेल्या खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सध्या साखर कारखाना बिकट अवस्थेतून जात असल्यामुळे सत्ताधाऱ्यांपुढे अडचणी आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर बिले न मिळणे, कामगारांचे थकलेल वेतन, सभासद तसेच कामगारांच्या नावावर त्यांना न कळून येणारी कर्जे यासारख्या तक्रारींमुळे कारखाना कायम नकारात्मकरित्या चर्चेत राहिला आहे. तर गेल्या निवडणुकीत आ. मकरंद पाटील यांनी कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष न घातल्याने सत्ताधारी गटाने एकहाती निवडणूक जिंकली.
त्यामुळे मकरंद पाटील यांनी कारखान्याच्या निवडणुकीत उतरावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात होती. त्यानंतर आ. पाटील यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. योग्य व्यूहरचना आखून योग्य चाचपणी केल्यानंतर कारखाना निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी मुलाखत व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजू कदम व तालुक्यांतील अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून विरोधकांना धक्का दिला. तसेच संपूर्ण लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे काहीसे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.
कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादीने लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर दि. 7 रोजी खंडाळा शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीकडून कारखाना उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली. खंडाळा गटातून दत्तात्रय नारायण ढमाळ, चंद्रकांत मारुतराव ढमाळ, अशोक संपतराव गाढवे, बावडा गटातून विश्वनाथ गोविंद पवार, किसन धायगुडे, रमेश धायगुडे, शिरवळ गटातून अनंत पांडुरंग तांबे, नितीन लक्ष्मणराव भरगुडे, विष्णू यशवंत तळेकर, लोणंद गटातून शिवाजीराव शेळके, धनाजी अहिरेकर, किसनराव दगडू ननावरे, संस्था व बिगर उत्पादक गटातून गजानन महादेव धुमाळ अनुसूचित जाती जमाती गटातून रत्नकांत भोसले, इतर मागास प्रवर्गातून सुरेश विठ्ठल रासकर, विशेष मागास प्रवर्गातून विठ्ठल जयसिंग धायगुडे, भादे गटातून हणमंत साळुंखे, ज्ञानेश्वर भोसले, साहेबराव कदम, महिला राखीवमधून शालिनी शंकरराव पवार, शोभा नेवसे यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
“खंडाळा सहकारी साखर कारखाना राजकारणाचे ठिकाण नाही. या कारखान्यावर हजारो लोकांचं कुटुंब चालते. हा कारखाना वाचला तर शेतकरी वाचेल म्हणूनच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्यानंतर शेतकरी हितासाठी कारखाना निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे. सत्ता आल्यावर कारखाना अपेक्षेपेक्षा दुप्पट क्षमतेने चालवून शेतकरी व सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील. तसेच सभासद व कामगारांच्या नावावर कारखान्यासाठी घेण्यात आलेल्या सर्व कर्जांची रक्कम कारखान्याकडून भरण्यात येतील.”
– मकरंद पाटील (आमदार, वाई- खंडाळा- महाबळेश्वर)





