Satara : जिल्हा काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणुया

सातारा : सातारा जिल्हा काँग्रेसला एक वेगळा इतिहास असून जिल्ह्यातील काँग्रेस संघटना पुन्हा मजबूत करण्याची जबाबदारी निष्ठावंत व तरुण कार्यकर्त्यांवर आहे. सर्वांनी गट तट विसरुन जिल्हा काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणुया, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा निरीक्षक सचिन सावंत यांनी केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक काँग्रेस कमिटी संपन्न झाली. यावेळी श्री. सावंत बोलत होते. बैठकीस जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, ज्येष्ठ नेते विजयराव कणसे, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, सौ. अल्पना यादव, अजित पाटील-चिखलीकर, आनंदराव जाधव, झाकीर पठाण अमरजित कांबळे, संजय तडाखे, प्रताप देशमुख, बाबासाहेब कदम, जगन्नाथ अण्णा कुंभार, महेंद्र बेडके -सुर्यवंशी, पंकज पवार, विश्वंभर बाबर, मनोहर शिंदे, रफिक शेठ बागवान, रजनीताई पवार, नीलम येडगे, विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, सुषमा राजेघोरपडे, प्राची ताकतोडे, मालन परळकर, रजिया शेख, अॅड. श्रीकांत चव्हाण, अॅड. दत्तात्रय धनावडे, सरफराज बागवान, संदीप माने, अशोकराव पाटील, श्रीनिवास पाटील, बाबासाहेब माने, विलास पिसाळ, कल्याण पिसाळ, राजेंद्र पाडले, अमर करंजे, अन्वर पशाखान, नामदेव पाटील, दर्शन कवर, सुरेश इंगवले आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सातारा जिल्हा महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवतराव चव्हाण यांच्या विचारांचा असून तो काँग्रेसचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सक्रिय राहीलं पाहिजे. येत्या काळात संघटनात्मक ताकद दाखवण्यासाठी शिस्तबद्ध आणि नियोजनातून जनसंपर्काचं काम वाढवणं गरजेचं आहे. जिल्ह्यातील काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांना पदमुक्त करून त्या रिक्त पदावर नवीन होतकरू व पक्ष निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याची पक्षाची भूमिका आहे. यावेळी श्रीरंग नाना चव्हाण -पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. सुरेश जाधव यांनी केले. स्वागत नरेश देसाई यांनी केले.
काहीजण अडचण सोडवण्यासाठी गेले असतील
जे गेलेत किंवा जाणार आहेत त्यांना जाऊ द्या, जे आपले कधी नव्हते. सत्तेच्या स्वार्थासाठी काहीजण अडचण सोडवण्यासाठी गेले असतील. त्यामुळे आता पक्षनिष्ठा असणाऱ्या नवीन लोकांना संधी मिळणार आहे. राज्यात व सातारा जिल्ह्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा एक ब्रँड नेता आहे त्यामुळे तुमचा आमचा ब्रँड नेता जपून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करणे गरजेचे आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.





