Satara : आनंदी राहण्यासाठी ज्येष्ठांनी व्यस्त राहणे महत्त्वाचे- मांडके

सातारा : ज्येष्ठ नागरिक आनंदी व निरोगी राहावेत यासाठी त्यांना परिस्थितीशी जुळवून घेणे, पुरेसा व्यायाम करणे, व्यस्त राहणे व सामाजिक कामात गुंतवून ठेवणे हे चार मुद्दे उपयोगी ठरतात, असे मत ज्येष्ठ नागरिक संघ साताराचे माजी कार्यवाह व ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी व्यक्त केले.
येथील शाहूनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठांचे सामाजिक मूल्य व आनंदी जीवन या विषयावर विजय मांडके यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अर्जुनराव घोरपडे होते.
विचार मंचावर कार्याध्यक्ष अशोकराव मोरे, उपाध्यक्ष रमेश जमदाडे, सचिव सुदामराव निकम व हणमंतराव कणसे उपस्थित होते. नातवंडांवर संस्कार व समाजसेवा या दोन जबाबदाऱ्या ज्येष्ठांसाठी आनंददायी ठरतात, असे सांगून विजय मांडके यांनी सामाजिक काम , करमणूक, बागकाम, संगीत, वाचन, लेखन समवयस्कांबरोबर गप्पा अशा अनेक कार्यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याची आवश्यकता आहे असे नमूद केले. ज्येष्ठांनी आनंदी कसे राहावे यासाठी अनेक उपक्रम त्यांनी यावेळी सांगितले.
वाढदिवस असलेल्या सभासदांचे यावेळी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच निधन पावलेल्या ज्ञात- अज्ञात मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. रमेश जमदाडे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. अशोकराव मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत नलावडे यांनी आभार मानले.





