कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले; जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवास सुरुवात
सातारा : महिला व बाल विकास विभागामार्फत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये सातारा जिल्ह्यात कार्यरत बालगृहातील अनाथ, निराधार, उमार्गी, विधी संघर्षग्रस्त मुले/मुली यांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन पोलीस कवायत मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन सहायक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, बाल कल्याण समिती अध्यक्षा सुचित्रा घोगरे-काटकर आदी उपस्थित होते.
जिल्हयात कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुला-मुलींनी कला व सुप्त गुणांना संधी देण्याचे काम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे असे सांगून सर्व मुला-मुलींना एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना ठेऊन खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त श्री. भिसले यांनी केले.
या बाल महोत्सवात क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, 100 मिटर धावणे, 200 मिटर धावणे, 400 मिटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, उंच उडी, लांब उडी यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजयी व उपविजयी संघांना शिल्ड, ट्रॉफी, स्पर्धकांना प्रमाणपत्र व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. असे प्रास्ताविकात श्री. तावरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास बाल कल्याण समितीमधीचे सदस्य, बालगृहांचे अधिक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.