कराड : कराड उत्तर मतदारसंघातील जनतेला पाणी प्रश्नावर गेल्या 35 वर्षांपासून झुलवत ठेवण्यात आले; परंतु येत्या दोन वर्षांत या मतदारसंघात पाणी प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. पाल-इंदोली उपसा उपसा जलसिंचन योजनेला 50 मीटरवरून 100 मीटर हेडची मंजुरी मिळाल्याशिवाय पाल, उंब्रज भागात जाहीर सभा घेणार नाही, असा शब्द विधानसभेच्या वेळी दिला होता. त्यामुळे या योजनेला 100 मीटर हेडची मंजुरी घेऊनच आज पाल येथे सभेत उभा राहिलो आहे. मी दिलेला शब्द पाळला असून, पाणी प्रश्न सोडवण्यात कमी पडणार नाही, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाणसाहेब पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ पाल, ता. कराड येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार घोरपडे म्हणाले, पाणी हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. पाण्यासाठी मतदारसंघातील लोकांना वणवण करावी लागू नये, म्हणून लागतील ते प्रयत्न करणार आहे. पाल-इंदोली उपसा सिंचन योजना 50 मीटर हेडची असल्याने, या भागात शेती पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्यासाठी या परिसराला झुलवत ठेवण्यात आले; परंतु खंडोबाच्या नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी या योजनेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन ना. फडणवीस यांनी दिले होते. ते आश्वासन पाळले आहे. ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमवेत दोनच दिवसांपूर्वी बैठक घेऊन, या योजनेसाठी 100 मीटर हेडची मान्यता आणली आहे. यासाठी लवकरच निधी मिळणार आहे. हणबरवाडी-धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात आला असून, दुसर्या टप्प्यासाठी निधी मंजूर करून आणला आहे. राजाचे कुर्ले आणि शामगाव या गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी टेंभू योजनेतून पाणी दिले आहे. गणेशवाडी-समर्थनगर उपसा सिंचन योजनेची मंजुरी आणली असून, येत्या दोन वर्षांत कराड उत्तरमध्ये पाणी प्रश्न शिल्लक राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उंब्रजच्या उड्डाणपुलाचे महिन्याभरात टेंडर उंब्रज येथे उड्डाणपुलाची मागणी सातत्याने होत होती. आमदार नसतानाही, या उड्डाणपुलाला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. उंब्रज परिसरातील लोकांनी पाठिंबा दिल्याने उड्डाणपुलाचा प्रश्न आमदार झाल्यानंतर उचलून धरला. यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला. येत्या महिनाभरात उड्डाणपुलाचे टेंडर निघून, हा प्रश्न मार्गी लागेल. उंब्रज बाजारपेठेशी निगडीत असलेल्या गावांची समस्या कायमची दूर होणार आहे. असे आमदार घोरपडे यांनी सांगितले. हणबरवाडी-धनगरवाडी योजनेसाठी मंत्रालयात बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमवेत मुंबईमध्ये विधान भवनात आमदार मनोज घोरपडे यांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. या बैठकीत हणबरवाडी-धनगरवाडी योजनेसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आ. सचिन पाटील, आ. विश्वजित कदम आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.