सातारा | जांब बुद्रुक विकास सोसायटीचा सर्वाधिक १३ टक्के लाभांश जाहीर

कोरेगाव – जांब बुद्रुक, ता. कोरेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने उत्कृष्ट कामकाज करत यावेळी चांगला नफा मिळवला असून शेतकरी सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर केला आहे.
सोसायटीचे मार्गदर्शक संचालक प्रताप कुमुकले निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चेअरमन शरद निकम यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यामध्ये शेतकरी हितासाठी सर्वाधिक १३ टक्के लाभांश जाहीर करत असल्याचे सचिव राजेंद्र मुळीक यांनी जाहीर केले. व्हाईस चेअरमन शंकर निकम यांनी सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
सातारा जिल्हा बँकेची चेअरमन खासदार नितीन पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जांब विकास सोसायटीने शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून सोसायटीने शेतकरी हिताला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ दिला आहे.
सचिव राजेंद्र मुळीक यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. ऐनवेळीचे विषयांमध्ये चेअरमन शरद निकम यांनी विविध विषय मांडले, त्यास सर्व सभासदांनी एकमताने मान्यता दिली. जांब बुद्रुक विकास सोसायटीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, विभागीय विकास अधिकारी, विकास अधिकारी व शाखाधिकाऱ्यानी अभिनंदन केले आहे.





