Satara : जलतारा उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान

सातारा : टंचाई व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या २६६ कामांसोबतच जलतारा प्रकल्प रोजगार निर्मिती, जलस्रोत पुर्नभरणासाठी उत्तम पर्याय आहे. जिल्ह्यात १४ हजार १७ जलतारा कामांना मंजुरी देण्यात आली असून शेतकऱ्यांनी जलतारा उपक्रमाची अमंलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
धुमाळवाडी (ता. फलटण) येथे जलतारा कामाचा शुभारंभ आमदार सचिन पाटील, याशनी नागराजन, गटविकास अधिकारी कुंभार यांच्या उपस्थितीत झाला. याप्रंसगी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ, मनरेगा कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन व भूजल पातळी वाढविण्यासाठी नरेगाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमार्फत जलतारा मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी 39 कोटी 39 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून 11 तालुक्यांत 75 हजार कामा प्रस्तावित आहेत. नरेगासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती याशनी नागराजन यांनी दिली.
जलस्रोत पुनर्भरण अभियानांतर्गत पाच चौरस फूट क्षेत्रफळ सहा फूट खोल खड्डा लहान मोठया दगडाने भरुन घ्यावा लागणार आहे. एका जलतारा कामासाठी नरेगामधून शेतकऱ्यांना मजुरी स्वरुपात 5263 रुपये देणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत प्रती ग्रामपंचायत 50 जलतारा कामांचे 74 हजार 850 कामांचे लक्ष्यांक प्रस्तावित आहे. ही कामे प्रामुख्याने खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव व कराड या तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहेत. जलताराची 14 हजार 17 कामे सुरु करण्यात आली आहेत. या कामांमुळे ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे, असे नागराजन यांनी स्पष्ट केले.
जलतारा प्रकल्प कामाचे फायदे
• पावसाचे अधिक पाणी शेतात मुरविणे
• भूगर्भातील पाणीपातळी वाढविणे
• पाणीटंचाई परिस्थितीवर मात करणे
• एका कामामुळे प्रत्येक हगांमात 3 लाख 60 हजार लीटर पाणी भूगर्भामध्ये मुरविण्याची क्षमता
• टंचाई भागामध्ये पाणीपुरवठा विहिरीभोवती 80 ते 100 जलतारा घेतल्यास टॅंकरमुक्ती





