Satara IT Park – जिल्ह्यातील युवकांना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळावी यासाठी जिल्ह्यात आयटी पार्क होण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना आज मोठे यश मिळाले. नागेवाडी (ता. सातारा) येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढी शासकीय जमीन आयटी पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्याकडे वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला, त्यामुळे सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत. जिल्ह्यातील आयटी क्षेत्राशी निगडीत इंजिनियर्स आणि युवक व युवतींना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, येथील युवकांना पुणे, मुंबई यासह अन्य राज्यातील शहरात नोकरीसाठी जावे लागू नये यासाठी नागेवाडी (लिंब खिंड) येथील शासकीय जागेत आयटी पार्क उभारण्यात यावा, यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला होता. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपूर्वीच या जागेची पाहणी एमआयडीसी विभागामार्फत करण्यात आली होती. शिवेंद्रसिंहराजे भोसले ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत नागेवाडी येथील गट नं. ३०८/१ येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढे क्षेत्र आयटी पार्कसाठी आरक्षित करण्यात आले होते. आयटी पार्क विकसित करण्याचे काम प्रत्यक्ष सुरु होण्यासाठी ही जागा महसूल विभागाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करणे आवश्यक होते. यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार आज मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागेवाडी येथील ४२ हेक्टर ५५ आर शासकीय क्षेत्र आयटी पार्क विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी मान्यता राज्याच्या महसूल विभागाने दिली. त्यामुळे जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पुढील कार्यवाही गतीने केली जाणार आहे. पुढील कार्यवाही गतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. “सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करणे आवश्यक आहे. नागेवाडी येथील आयटी पार्क प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला गती मिळेल. राज्य शासन उद्योग विकासाला प्राधान्य देत असून, अशा प्रकल्पांद्वारे ग्रामीण भागातही आधुनिक विकास घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.” – शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र)