सातारा : विलासकाकांसारखे वैचारिक अधिष्ठान असणे गरजेचे

ऍड. उदयसिंह पाटील; संस्था अधिक सक्षम करा, कोयना बॅंकेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप
कराड – स्व. विलासकाकांच्या वैचारिक अधिष्ठानावर संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विश्वास होता. दुर्दैवाने काका आज आपल्यात नाहीत. आपण सर्वजण काकांचे विचार जोपासत आहोत. माझाही तोच प्रयत्न आहे. मी काकांचा मुलगा असलो, तरीही संघटनेचा कार्यकर्ता म्हणून तुमच्यासोबत काम करतो आहे. अडचणी, संकटाला सामोरे जाव लागणार आहे. परंतु, काकांसारखे वैचारिक अधिष्ठान असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोयना बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले.
बॅंकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बॅंकेच्या सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रम बॅंकेच्या मुख्य कार्यालयात ऍड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बॅंकेचे चेअरमन रोहित पाटील, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, रयत कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरूड, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, जि.प. सदस्य प्रदीप पाटील, प्रा. धनाजी काटकर, हणमंतराव चव्हाण साजूरकर, संपतराव इंगवले, बाबुराव धोकटे, मोहनराव माने, बाजार समितीचे संचालक जगन्नाथ लावंड, नितीन ढापरे, प्रकाश पाटील, बॅकेचे उपाध्यक्ष विजय मुठेकर, सर्व संचालक मंडळ, कोयना बॅंकेचे अधिकारी सेवक व रयत संघटनेतील कार्यकत्यांची उपस्थिती होती. प्रारंभी, राज्याचे माजी सहकार मंत्री, लोकनेते स्व. विलासरावजी पाटील (काका) यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
ऍड. पाटील म्हणाले, कोयना बॅंकेने अत्याधुनिक तंत्राचा अवलंब करून बॅंकेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. उद्दिष्ठ पुर्तते बरोबरच आदर्शवत व पारदर्शक बॅंकिंग करत बॅंकेची सांपत्तीक स्थिती भक्कम झाली आहे. बॅंकेने मोबाईल बॅंकिंग सुविधा कार्यान्वित केली असून खातेदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, आर्थिक क्षेत्रात चालू असलेल्या स्पर्धेच्या युगातही संघटनेच्या आर्थिक संस्था सुस्थितीत चालल्या आहेत. बॅंकेचे संचालक मंडळ, सेवक वर्ग बॅंकेची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. स्व. काकांनी 53 वर्षे सामाजिक जीवनामध्ये तालुक्यात, जिल्ह्यात संघटनेच्या माध्यमातून काम केले. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक देशात अग्रगण्य बॅंक म्हणून नावारूपास आणली. परंतु, रयत साखर कारखान्यात अयशस्वी झालो, ही काकांच्या मनामध्ये खंत होती. ती खंत संचालक मंडळाला बोलून दाखविली. संचालक मंडळाने काकांना पुन्हा एकदा प्रयत्न करण्याबाबत चर्चा केली. काकांनी स्वत:चे योगदान देत काही योजना तयार केल्या. 2500 टन गाळप क्षमतेचा कारखाना 100 कोटीच्या कर्जामध्ये होता. तो आज 5000 टन गाळप क्षमतेचा, 15 मेगावॅट कोजनरेशसह गाळपास तयार होत आहे. हे संघटनेने केलेले काम आहे.
पास्ताविकात बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी बॅंकेच्या भक्कम आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. प्रा. धनाजी काटकर, लक्ष्मणराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. बॅंकेचे संचालक राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.





