Satara: मुलांमध्ये नकार पचवण्याची ताकद निर्माण होणे गरजेचे

रहिमतपूर : हुकूमशहा, रुढीवाचक, भित्रे व तटस्थ, असे पालकांचे प्रकार आहेत. भित्र्या पालकांच्या मुलांमध्ये नकार पचवण्याची क्षमता नसते. ही नकार पचवण्याची ताकद मुलांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आई-वडिलांमध्ये एकमत हवे, असे मत घारेवाडी, ता. कराड येथील शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विविध जिल्ह्यांमधील 776 विद्यार्थ्यांचा गुणगौरव रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. व्यासपीठावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे माजी सहसचिव राजेंद्र पवार, अभिनेता नितीश चव्हाण, राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, बीडचे उपशिक्षणाधिकारी मनोज धस, हसत खेळत प्रकाशन संस्थेचे प्रमुख दत्तात्रय जाधव, पद्मभूषण वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील माने, चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब हे दुःख विसरण्याचे व सुख वाढवण्याचे ठिकाण होते. त्यामुळे मुलांना सामाजिक जीवन जगायला शिकवावे लागत नव्हते. आता कुटुंबांमध्ये प्रचंड पोकळी आहे. मुले सहजासहजी घडत नसतात. तुमची मुले इतरांचे नव्हे, तर आई-बाबांकडे बघूनच वाढतात. वाघाचे पंजे झेलायची ताकद पालकांच्या छातीत असावी लागते, तेव्हा त्याच्या पोटी वाघ जन्माला येतो.
रूपेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय जाधव यांनी आभार मानले. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मते खरे यश तेव्हा म्हणायचे, जेव्हा तुमची सही ‘ऑटोग्राफ’मध्ये बदलते. याचा आधार घेऊन, राज्य गुणवत्ता यादीतील मुलांचे कौतुक करण्यासाठी विशिष्ट सेल्फीचे आयोजन करण्यात आले होते. तेथे विद्यार्थी सही करत होते. राज्यस्तरावरील यशामुळे आपली सही ‘ऑटोग्राफ’मध्ये बदलल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसत होता.





