महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणे गरजेचे – आ. बाळासाहेब पाटील

उंब्रज : लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर ‘चारशे पार’चा नारा दिला होता; परंतु जनतेने त्यांचे मनसुबे उधळून लावले. त्यामुळे त्यांना इतर पक्षांच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन करावे लागले. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात अनेक कामे झाली. अनेक योजना राबवण्यात आल्या; परंतु दुर्दैवाने सरकार गेल्यानंतर ती कामे महायुतीच्या सरकारने थांबवली. या कामांना पुन्हा प्राधान्य देण्यासाठी महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणे गरजेचे आहे, असे मत महाविकास आघाडीचे कराड उत्तर मतदारसंघाचे उमेदवार आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
आ. पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ पाल, ता. कराड येथे श्री खंडोबा म्हाळसाकांतचरणी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब पवार-मांडवेकर, यशवंत साळुंखे, रामभाऊ जगदाळे, मानसिंगराव जगदाळे, जितेंद्र पवार, भाग्यश्री भाग्यवंत, संगीता साळुंखे, पै. संतोष वेताळ, सौ. सुषमा राजेघोरपडे, मनोज घोरपडे, सुरेश पाटील (बापू), दत्ता रुद्रके, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, आजपर्यंत मतदारसंघात यशवंत विचार जपला आहे. बेरजेचे राजकारण करून, विकासकामे केली आहेत. एकीकडे फसव्या योजना आणून, जनतेला आमिष दाखवायचे आणि दुसरीकडे कर वाढवून जनतेच्या खिशातून पैसे काढून घेण्याचे काम महायुती सरकारने सुरू केले आहे. शेतीमालाचे भाव पडत आहेत, तर दुसरीकडे महागाई प्रचंड वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. सध्या सरकारच्या योजना महाविकास आघाडी पुढे सुरू ठेवणार आहे. ही लढाई आरपारची नाही, तर विचारांची आहे. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला विचार मी पुढे नेत आहे. निवडणुकीत अर्ज भरताना, माझ्याशी नामसाधर्म्य असलेले लोक विरोधकांनी मतदारसंघाच्या बाहेरून आणून, रडीचा ढाव खेळला आहे. जी कामे केली नाहीत, त्या कामांचे फुकटचे श्रेय ही मंडळी घेत असल्याचे जनता ओळखून आहे. राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. विरोधक वावड्या उठवतील, पण कार्यकर्त्यांनी संयम ढळून देऊ नये. विजय आपलाच आहे.
देवराज पाटील म्हणाले, निवडणुकीपुरती येणारी मंडळी कामाचे खोटे श्रेय घेत आहेत. मात्र, येथील जनता सूज्ञ व स्वाभिमानी आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या या मतदारसंघाचे नेतृत्व आ. बाळासाहेब पाटील हे गेली 25 वर्षे करत आहेत. आ. पाटील यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून, समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मतदारसंघात गेल्या 25 वर्षांत विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या आ. बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी जनता आहे. आता आमिषे दाखवली जातील; पण येथील जनता बळी पडणार नाही.
राजकारणाचा चिखल करण्याचे काम भाजप करत आहे. राजकारणात ध्येयधोरणे पाहिजेत. वाममार्गाने पैसा कमवायचा आणि त्या माध्यमातून सत्ता मिळवायची. समाजात जातीय तेढ निर्माण करून तरुण पिढीला भरकटवले जात आहे. भाजपच्या सत्तेच्या काळात देश मागे जात आहे. त्यामुळे येत्या काळात सत्ता परिवर्तन करा, असे आवाहन सुनील माने यांनी केले. सर्जेराव खंडाईत यांनी प्रास्ताविक केले. उद्धवराव फाळके यांनी आभार मानले.
यशवंत विचार जपणार
कराड उत्तरमधून पै. संतोष वेताळ यांनी उमेदवारी मागे घेऊन, आ. बाळासाहेब पाटील यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत विचार जपण्यासाठी आपली उमेदवारी मागे घेतल्याचे पै. वेताळ यांनी यावेळी सांगितले.





