प्रभात वृत्तसेवा सातारा / बामणोली – जावळी तालुक्यातील सावरी येथे कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाच्या कच्च्या मालाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने (युनिट 7) ओंकार दिघे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून ४३ किलोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येथील रस्त्याचे काम करण्यासाठी असणाऱ्या कामगारांना शेड घ्यायचे निमित्त करुन गोविंद शिंदवडेर यांच्या शेतातील एका शेडमध्ये सेंटेंड हुक्का बनवण्याची थाप मारुन ते भाड्याने घेण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे युनिट 7 चे पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुणे व ठाणे येथे कारवाई करुन एकाला ताब्यात घेतले तेव्हा जावळी तालुक्यातील सावरी गावाचे कनेक्शन समोर आले. अत्यंत गोपनीयतेने याबाबतची कारवाई करण्यात आली आहे. मेढा पोलीस यंत्रणा या निमित्ताने अलर्ट मोडवर आली आहे .या शेडमध्ये एमडीचे ३६ लीटर कच्चे द्रावण व ७ किलोचे इतर साहित्य असा 43 किलो मुद्देमाल येथे सापडला आहे. दिघेसह अन्य तीन अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघे पश्चिम बंगालमधील कामगार आहेत. मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर मेढा पोलिसांचे एक पथक सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखालीघटनास्थळी रवाना झाले आहे. जावळी तालुक्यातील सावळीत (सावरी) एमडी ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यासाठी सावरी गावात मुंबई क्राईम ब्रँचने मोठा छापा टाकला.एका शेडमध्ये एमडी ड्रग्स तयार होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजन करून छापा टाकला असता एमडीचा कच्चा माल ताब्यात घेण्यात आला. शिंदवडे यांच्या शेतातील शेड दिघे याने पुणे येथील एकाच्या सांगण्यावरुन आठवड्यापूर्वीच भाड्याने घेतले होते. मुंबईत चालणाऱ्या हुक्का पार्लरमध्ये सेंटेड हुक्का बनवण्यासाठी ही जागा हवी असल्याची लोणकढी थाप जागामालकाला मारण्यात आली होती. आता मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संवेदनशील गावातच… सावरी गाव हे जावळी तालुक्यातील संवेदनशील क्षेत्रात येणारे असून पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शासकीय प्रोटोकॉलच्या निमित्ताने शासकीय यंत्रणांची येथून सातत्याने ये जा असते. असे असताना देखील बामणोलीपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावरी येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर एमडीचा कच्चा माल आढळावा व याचा कोणालाही थांगपत्ता लागू नये याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडे कसून चौकशी सुरू केली आहे.