सातारा :माझ्या मतदारसंघात मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा डाव; खा. उदयनराजे यांचा आरोप

सातारा जिल्हा बॅंक निवडणुक
सातारा – जिल्हा बॅंकेत काही जण मतदारांचा मतांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मतदारसंघातही असाच मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा डाव काहींनी रचला होता; पण आम्ही वकील देऊन पुन्हा त्या मतदार सभासदांचा मतांचा अधिकार कायम ठेवला, असा गौप्यस्फोट खा. उदयनराजे भोसले यांनी केला. दरम्यान, मतदार सभासदांची बैठक घेऊन, त्यांची मते जाणून घेतली असती, तर जास्त संयुक्तिक झाले असते, असा टोलाही त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीवरून लगावला.
गोडोली येथील कार्यक्रमानंतर उदयनराजेंनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या विषयावरून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, जिल्हा बॅंक शेतकऱ्यांची आहे, त्यांना कर्ज मिळावे, त्यातून त्यांची प्रगती व्हावी, यासाठी जे कोणी निवडून जाणार आहेत, त्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे.
काही वेळा आपण नको ते लोक निवडून देतो आणि बॅंक किंवा संबंधित संस्थेचे खासगीकरण झालेले पाहायला मिळते. सहकारी संस्था मोडीत काढल्या जातात. आपले नशीब चांगले आहे की, सातारा जिल्हा बॅंकेचे कामकाज उत्कृष्ट आहे. बॅंकेत अलीकडे मतांचे राजकारण सुरू आहे. गृहनिर्माण, दुग्धविकास, पाणीपुरवठा मतदारसंघातील मतदारांचा मतांचा अधिकार रद्द कसा होईल, यासाठी काही जण प्रयत्न करतात.
मुळात मतदान कोणाला करायचे, हा सभासदांचा अधिकार आहे; पण मलाच करा, यालाच करा, असे बंधनकारक केले जाते. बॅंक एका उंचीवर रहावी, बॅंकेला गालबोट लागू नये, याचा विचार झाला पाहिजे. सभासदांनी संचालक निवडून देताना संबंधितांमुळे किती संस्था मोडकळीस आल्या, हे लक्षात घ्यावे. त्यानंतरच त्यांना निवडून द्यायचे की नाही, हे ठरवावे.





