दिवाळीच्या खमंग फराळाला महागाईचा झटका

सातारा – दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारपेठेत खरेदीची धूम उडाली आहे. दिवाळी आणि खमंग फराळ हे समीकरण घट्ट आहे. मात्र, यंदाचा फराळ खरेदी करताना सातारकरांना थोडा खिसा जास्त दराने हलका करावा लागणार आहे. रवा, मैदा, गुळ, साखर, तूरडाळ, हरभरा यांच्या दरामध्ये वाढ झाल्याने प्रत्येक पदार्थाचे भाव पंधरा ते वीस रुपयांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. फराळाच्या किमती 15 ते 20 टक्के महाग झाल्या तरी बाजारपेठेत तयार फराळांना आणि बॉक्स पॅकिंगलाही मागणी वाढत आहे.
दिवाळीला घरोघरी शंकरपाळी, करंजी, खारीपुरी, चिरोटे, अनारसे, शेव, चकली, रवा लाडू, बेसन लाडू, विविध प्रकारचे चिवडे असा फराळ तयार केला जातो. घरोघरी फराळाच्या पदार्थांची खमंग दरवळ घमघमू लागली आहे. एकीकडे ही तयारी सुरू असताना गृहिणींना तितकासा वेळ मिळत नसल्याने अलीकडच्या काही काळात तयार फराळ मागवण्याचा कल सुरू झाला आहे.
मात्र, यंदा डाळी व अन्य वस्तूंचे दर वाढल्याने फळांच्या किमतीतही काही अंशी वाढ झाली आहे. सेंद्रिय गुळ 65 रुपये किलोवर पोहोचल्याने गुळाचे पदार्थ महागण्याची चिन्हे आहेत. रवा व मैद्याचा दर 36 रुपयेवरून 41 रुपयांवर पोहोचला आहे. हरभरा डाळ 75 रुपयांवरून 85 रुपयांवर पोहचली आहे. साखरेच्या दरामध्ये सुद्धा दहा रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारपेठेत चक्कर मारली असता मोतीचूर लाडू 220 रुपये किलो, बेसन लाडू 490 रुपये किलो, रवा लाडू 480 रुपये किलो, अनारसे पंचवीस रुपये एक नग, पातळ पोहे 260 रुपये किलो, शंकरपाळी 220 रुपये किलो, बाकरवडी 260 रुपये किलो, बुंदी शेव 280 रुपये किलो, चकली 325 रुपये किलो असे भाव दिसून येत आहेत
खमंग फराळाच्या प्रत्येक पदार्थाच्या दरांमध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याने यंदा सातारकरांना थोडी महाग दराने दिवाळीचा फराळ खरेदी करावा लागणार आहे. सातारा शहर आणि तालुक्यातील 125 बचत गटांकडे सध्या प्राप्त माहितीनुसार 50 लाख रुपयांच्या दिवाळी फराळाच्या ऑर्डर आहेत. यातील बहुतांश फराळ हा परदेशात निर्यात होण्याच्या मार्गावर आहे. तसेच ऑनलाइन फराळ नोंदवा आणि घरपोच डिस्काउंट मिळवा, फराळांच्या अशाही आकर्षक जाहिराती दिसत आहेत. गोडसर करंजीचा तयार भाव 240 ते 260 रुपये किलो आहे. यंदा तमिळनाडूवरून येणाऱ्या मद्रास नारळाची आवक कमी झाल्याने गोटा नारळाला जास्त मागणी वाढली आहे. करंजीच्या सारणात खोबऱ्याचा मुक्तहस्ते वापर होतो. यंदा नारळाची आवक मंदावल्याचे चित्र आहे.
काम व घराच्या जबाबदारीतून नोकरदारांना वेळ मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा कुटुंबांना महिला बचत गटांकडून फराळ पुरवला जातो. सातारा शहरात, शाहूपुरी, राजवाडा परिसर, कमानी हौद, पोवई नाका येथे बचत गटांचे तयार फळांचे स्टॉल लागू लागले आहेत. दुष्काळी झळांच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी आनंदी असली तरी महागाईमुळे थोडी हिरमुसली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाची उलाढाल दहा टक्क्याने घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.





