Satara : रस्ते विकासाच्या नावाखाली सुरूर, वाई, रस्त्यावर बेसुमार वृक्षतोड

भुईंज : एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करून दरवर्षी लाखो नव्या वृक्षांची लागवड करण्याची मोहीम शासन हाती घेत असते. तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल करून शासनाच्या या मोहिमेला हरताळ फसला जात असल्याचे चित्र सध्या वाई, सुरूर रस्त्याच्या बांधकामात दिसून येत आहे. सुरूर, वाई , पोलादपूर रस्त्याचे काम संपेपर्यंत सुमारे हजारो वृक्षांची कत्तल होणार आहे. नागरिक अधिकाऱ्यांकडून याला विरोध असतानाही ठेकेदार समीर रहाट मनमानी व अरेराविणे कोणालाही न जुमानता ही झाडे तोडत आहेत. त्यामुळे जनतेतून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरूर, वाई, पोलादपूर या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शासनाने या रस्त्याच्या कामासाठी २९३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. सुरूर, वाई, पोलादपूर या रस्त्यावर शंभर वर्षाहून अधिक ब्रिटिशकालीन वडाची झाडे आहेत. दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणात झाडे अडथळा ठरत असल्याने या झाडांची कत्तल होत आहे.
या रस्त्यास निधी देत असताना रस्त्यावरील कारण नसतानाही कोणतेही झाड पाडू नयेअसा शासनाचा आदेश आहे. तरीसुद्धा या शासनाच्या आदेशाला ठेकेदाराकडून केराची टोपली दाखवली जात आहे. शंभर वर्षांपूर्वी असलेली झाडे विकासाच्या नावाखाली जमीन दोस्त होत आहेत. याच झाडांच्या सावलीत ऐण उन्हाळ्यात वाहनधारक क्षणभर विश्रांती घेतो. मात्र, या झाडांची सावली आता दुरापस्त होणार आहे. रस्ते विकासाच्या नव्या धोरणात नवीन वृक्ष लागवड असली तरी अद्याप याला प्रारंभ झालेला नसल्याने झाडांची सावली मिळण्यास किती वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वृक्षांच्या कत्तलीकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष
सुरूर, वाई, पोलादपूर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम करत असताना हजारो वृक्षांची कत्तल होत आहे. मात्र, तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी संबंधित ठेकेदारास कडक सूचना देऊन झाडांची कत्तल थांबवण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
वृक्षप्रेमी कोठे आहेत?
सुरूर , वाई रस्त्याचे काम कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. ते सुरू असताना हजारो वृक्षांची कत्तल होत आहे. ठेकेदार मनमानी करून झाडांची कत्तल करत आहे. मात्र हे सर्व होत असताना वृक्षप्रेमी गांधारीच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जर या प्रकरणात वृक्षप्रेमींनी लक्ष दिले तर वृक्षांची तोड थांबण्यास निश्चितच मदत होईल.





