Satara: साक्षरतेच्या प्रकाशाने उजळतोय सातारा; जिल्ह्यात ‘उल्लास साक्षरता पंधरवडा’ उत्साहात
Satara: 15 वर्षे आणि त्यावरील असाक्षर व्यक्तींना साक्षर करणे. त्यांना वाचन, लेखन, संख्याज्ञान, दैनंदिन जीवनातील व्यवहारज्ञान आणि कौशल्ये मिळवून देणे, हा ‘उल्लास - नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

Satara: ‘साक्षर नागरिक, सक्षम समाज, साक्षर समाज, विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देत, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र सरकार पुरस्कृत ‘उल्लास – नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत जनजागृतीपर उपक्रमांमधून साक्षरतेचा जागर करण्यात येत आहे.
15 वर्षे आणि त्यावरील असाक्षर व्यक्तींना साक्षर करणे. त्यांना वाचन, लेखन, संख्याज्ञान, दैनंदिन जीवनातील व्यवहारज्ञान आणि कौशल्ये मिळवून देणे, हा ‘उल्लास – नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षात सातारा जिल्ह्यासाठी 32 हजार 984 असाक्षरांच्या नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 13 हजार 433 असाक्षरांची आतापर्यंत‘उल्लास पोर्टल’वर नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा, शिक्षक, स्वयंसेवक आणि विविध घटकांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी 8 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला जातो. यानिमित्त केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ‘उल्लास साक्षरता पंधरवडा’ राबवण्यात येत आहे. एकही व्यक्ती निरक्षर राहू नये, या उद्देशाने या पंधरवड्यात ग्रामीण व शहरी भागात उपक्रम राबवले जात आहेत.
साक्षरता पंधरवड्यात जिल्हा, तालुका व गावपातळीवर प्रभातफेरी, जनजागृती रॅली, घोषवाक्ये, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, साक्षरता जागृती कार्यक्रम आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘चला शाळेत जाऊया’ या उपक्रमांतर्गत पाटण तालुक्यातील संभाजीनगर आणि तारळे येथील शाळांना राज्यस्तरीय अधिकारी सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे आणि जिल्हास्तरीय अधिकार्यांनी भेटी देऊन साक्षरता अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात असाक्षर नोंदणीचे उद्दिष्ट विहीत कालमर्यादेत पूर्ण करावे. साक्षरतेचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण समितीच्या सभापती तेजस्विनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर यांनी केले आहे.





