सातारा: वैराटगडाच्या पायथ्याला बेकायदेशीर उत्खनन

उत्खनन तात्काळ थांबविण्याची “आरपीआय’ची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वाई – वाई तालुक्यातील ऐतिहासिक पुरातन वैराटगडाच्या पायथ्याशी कडेगाव, व्याहळी पुनर्वसन, व्याजवडी व मालुसरेवाडीच्या हद्दीत धनिकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन सुरू केले आहे. त्यामुळे निसर्गाची हानी होवून तालुक्याचा सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा नष्ट होत चालला आहे.
याची तातडीने चौकशी करून बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यात यावे, तसेच दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा वाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाई, असा इशारा वाई तालुका अध्यक्ष श्रीकांत निकाळजे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे, दरम्यान यासंदर्भात वाई तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदनही देण्यात आले आहे.
वैराटगड हे वाई तालुक्याबरोबरच पायथ्याला असणाऱ्या कडेगाव, व्याहळी पुनर्वसन, व्याजवडी व मालुसरेवाडी या गावांचे वैभव आहे. पायथ्यालगत गावातील ग्रामस्थ, अनेक सामाजिक संस्था गडावर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वैराट गडाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा जतन करत आहेत. याठिकाणी अनेक पर्यटक भेटीला येत असतात. परंतु काही धनिकांनी वाई तालुक्यातील ऐतिहासिक ठेवा जेसीबी व पोकलेंनच्या सहाय्याने ठेचून काढण्याचे काम करत आहेत.
डोंगरांच्या पायथ्याला होत असलेले उत्खनन हे भविष्यात भूस्खलनासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे महसूल विभागाने वैराटगडाच्या पायथ्याला होत असलेले बेकायदेशीर उत्खनन तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पक्षाच्यावतीने तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका अध्यक्ष श्रीकांत निकाळजे, शहर उपाध्यक्ष बाजीगर इनामदार, रमेश मिसाळ, सागर शिंदे सूर्यकांत गायकवाड, अनिल सणस व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.





