सातारा – वेळ आणि अचूकता साधता आली तर यश मिळतेच

वाई – वेळ आणि अचूकता साधता आली तर यशाच्या पायर्या चढता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यश मिळवण्याच्याा वाटचालीत वेळ आणि जागा यांना भविष्यात अतिशय मोल द्यावे लागेल. शैक्षणिक व जीवनातील वाटचाल यशस्वी करण्यसाठी विद्यार्थ्यांनी जागा आणि वेळ याबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन पतकी यांनी व्यक्त केले.
येथील द्रविड हायस्कूलचा पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मधुसूदन पतकी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. संजीव गोखले होते. यावेळी शाळाप्रमुख सौ दर्शना कोरके, पर्यवेक्षक वैद्य, पालक संघाच्या सौ. प्रीती महाबळेश्वरकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रप्रदर्शन कक्षाचे उद्घाटन मधुसूदन पतकी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या माध्यमातून साकारलेल्या चित्रकृती मांडण्यात आल्या होत्या प्रास्तविक भाषणातून बोलताना सौ. कोरके यांनी शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. अभ्यास, कला व क्रीडा प्रकारात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार जाधव यांना, आदर्श गणित शिक्षक लिमये, आदर्श विज्ञान शिक्षक मोतेसरदार, आदर्श क्रीडा शिक्षिका सौ.गुरव, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी तनपुरे यांना देण्यात आला.व्यवसाय शिक्षण विभागातील अकरावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मधुसूदन पतकी यांनी शालेय जीवनाची आठवण करून देणारी कविता सादर करून आपल्या भावनांना व्यक्त केले. डॉ. संजीव गोखले यांनी विद्यार्थ्यानी प्रयत्न करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रवींद्र वीर यांनी आभार मानले. सौ. भोज यांनी सूत्रसंचालन केले. चित्रप्रदर्शन कक्षासाठी कलाशिक्षक देशमुख, आणि इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.





