खटाव – शेतीतील उत्पादन खर्च 20 टक्क्यांनी कमी करणे आणि उत्पादनात 30 टक्के वाढ करून, शेतकर्याच्या आर्थिक उत्पन्नात 25 टक्के वाढ करणे, या करार फार्मुल्यामुळे येस ग्रुपच्या करार शेतीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संस्थापक संजय भगत यांनी दिली. पुसेगाव येथील येस फ्रेश फार्म प्रोड्युसर्स कंपनीच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कंपनीच्या उपाध्यक्ष सारिका शिंदे, संचालक बाळूताई जगताप, संचालक श्रीकांत लावंड, प्रतिभा शिंदे, ओंकार भगत उपस्थित होते. संजय भगत म्हणाले, दरवर्षीप्रमाणे खरीप हंगामातील सोयाबीन व घेवडा पिकांचे करार सुरू आहेत. सोयाबीनला कमीत कमी पाच हजार 300 रुपये आणि घेवड्याला कमीत कमी सात ते आठ हजार रुपये दर देण्यात येणार आहे. बाजारपेठेतील दर वाढल्यास, त्याचा फरकही शेतकर्यांना देण्यात येणार आहे. करार शेतीमुळे शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. दरवर्षी कराराप्रमाणे मालाची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यांमध्ये वेळेत जमा करून, येस ग्रुपने शेतकर्यांचा विश्वास मिळवला आहे. मोफत मार्गदर्शन, बाजारभावापेक्षा जादा दर यामुळे शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. येस ग्रुपचा चढता आलेख म्हणजे प्रगतीचे लक्षण आहे. ते शेतकर्यांच्या हिताचे आहे. खटाव सारख्या दुष्काळी भागात येस ग्रुप शेतकर्यांचा आधारवड म्हणून काम करत आहे. शेतकर्यांचे मनोधैर्य उंचावण्यात ग्रुपने मोठी कामगिरी बजावली आहे. करार शेती हा शेतकरी आत्महत्येवरचा रामबाण उपाय आहे, असे मत सचिव अरविंद विधाते यांनी व्यक्त केले. व्यवस्थापक विक्रमसिंह शिंदे यांनी आभार मानले.