Satara : अर्थसंकल्पात ग्रामविकास विभागासाठी भरघोस तरतूद

सातारा : राज्याच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांनी भरघोस तरतूद केली आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 करिता राज्यात 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, 14 लाख 71 हजार लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या अनुदानाचे 2200 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांच्या मागणीवरून, या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.
या घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र नायगाव, ता. खंडाळा येथे उभारण्यासाठी ना. गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 3 जानेवारीला नायगाव येथे ना. गोरे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मारक आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार 142 कोटी 60 लाखांचा आराखडा शासनास सादर करण्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचा निश्चय ना. गोरे यांनी सातारा येथील मिनी सरस यात्रेत व्यक्त केला होता. त्यानुसार राज्यातील बचतगटांच्या उत्पादनांसाठी उमेद मॉल उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांसाठी 150 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे.
शाश्वत, समृद्ध पंचायतराज अभियान
ना. गोरे यांच्या सूचनेवरून ग्रामविकास व पंचायतराज विभागाने प्रस्तावित केल्यानुसार ग्रामीण क्षेत्रात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘मुख्यमंत्री शाश्वत, समृद्ध पंचायतराज’ अभियान राबवची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या अभियानात भाग घेणार्या ग्रामपंचायतीना तालुका ते राज्यस्तरापर्यंत पुरस्कार देण्यात येणार आहेत. पंचायत समित्यांच्या इमारतींसाठी निधी मिळवण्यासाठीही ना. गोरे यांचे प्रयत्न सुरु आहेत.





