Satara : शाहिरी कलेच्या संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील

सातारा : शाहिरी परंपरेने लोकमानसाप्रमाणेच लोकचेतना जागविण्याचे, चेतविण्याचे कार्य केले. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देश घडविण्यामध्ये शाहिरी कलेचे महत्वपूर्ण योगदान आहे. शाहिरी कलेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच या कलेसमोरील आव्हानांची चर्चा होण्याच्या दृष्टीने शाहिरी महोत्सवासारखे उपक्रम महत्वाचे ठरतात. ही कला जगभरात आणि जगासमोर मांडण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ. आशिष शेलार यांनी सांगितले.
येथे 9 ते 11 जून या कालावधीत शाहू कलामंदिरात शाहिरी महोत्सवाचा सांगता समांरभ ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहसंचालक निलेश धुमाळ, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, प्रतापगड संवर्धन समितीचे सदस्य पंकज चव्हाण, विक्रम पावस्कर यांच्यासह विविध पदाधिकारी, शाहिरांची उपस्थिती होती. सातारची माती देव, देश आणि धर्मासाठी त्यागाची प्रचंड मोठी परंपरा असणारी माती आहे.
हा जिल्हा साहित्य, कला आणि संस्कृतीचाही वारसा जपणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने स्वकियांसाठी स्वधर्मासाठी, स्वभाषेसाठी लढण्याची वृत्ती दिली. त्यामुळेच शाहिरी महोत्सवाच्या आयोजनासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली, असे सांगून ॲड. शेलार म्हणाले, ‘‘जो समाज आपली संस्कृती, वारसा, परंपरा जपतो तोच समाज पुढे जातो. आक्रमणे ही केवळ भूभागावर होत नसतात तर इंटरनेटसारख्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरांवरही हल्ला होत असतो. अशा काळात आपला देदिप्यमान वारसा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या संपन्न परंपरांचे जतन, संवर्धन, प्रचार व प्रसार याबाबी महत्वाच्या आहेत. त्यादृष्टीने ‘विरासत ते विकास तक’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा विभाग कार्य करतो आहे.’’
राष्ट्रनिर्मितीमध्ये शाहिरी परंपरेने मोलाचे योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख अशा सगळ्या शाहिरी परंपरेतल्या मंडळींनी आपले जीवन तळहातावर घेऊन पेटविलेला अंगार विसारता येणार नाही. म्हणूनच शाहीर साबळे यांनी गायलेल्या ‘‘जय जय महाराष्ट्र माझा’ ला महाराष्ट्र गीताचा दर्जा मिळाला, असे ॲड. शेलार यांनी सांगितले.
लोककला जपल्या पाहिजेत, या भूमिकेतून शासन लोककलांना राजाश्रय देण्याचे काम अशा महोत्सवांमधून करत असल्याचे सांगून आमदार घोरपडे यांनी डीजिटल युगाच्या क्रांतीमध्ये या कला जिवंत राहिल्या पाहिजेत, यासाठी हा विभाग कार्य करीत असल्याचे नमूद केले. शाहिरी महोत्सव येथे आयोजित करुन या कलेची अनुभती खऱ्या अर्थाने कदरदान सातारावासीयांना दिली, याबद्दल जिल्हाधिकारी पाटील यांनी विभागाचे आभार मानले. जिल्ह्याचा विकास भौतिक अंगानेच नव्हे तर सांस्कृतिक अंगानेही झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शिरीष चिटणीस यांनीही मनोगत व्यक्त केले.





