सातारा : पाटण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

तळमावले – पाटण येथील मडदरा नावाच्या शिवारात सुरेश सीताराम कळंत्रे यांच्या शेतात कुंभारगाव येथील शेतकरी दीपक हणमंतराव चव्हाण हे रविवारी दुपारी आपल्या सहा शेळ्या आणि सात बकर्या चरण्यासाठी घेऊन गेले असता, सायंकाळी 5 च्या सुमारास एक शेळी कळपासून थोड्या अंतरावर चरत होती. तेथून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकर्यासमोरच हल्ला करून शेळी ठार केली.
यावेळी दीपक चव्हाण यांनी आरडाओरडा करून, बिबट्याच्या तावडीतून शेळीला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेळी तिथेच सोडून बिबट्याने शेजारच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. त्यानंतर चव्हाण यांनी गावात फोन करून याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
कुंभारगावचे पोलीस पाटील अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन, या घटनेची माहिती वन विभागाला दिली. त्यामुळे वन कर्मचारी वामन साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
वामन साळुंखे म्हणाले, सध्या शिवारात ऊसतोड सुरू आहे. ऊसक्षेत्र आणि डोंगरातील पाणीसाठ्यांमधील पाणी कमी झाल्याने बिबटे मानवी वस्तीत येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांनी खबरदारी घ्यावी.





