Satara : शिरवळ येथे चार वर्षांच्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू

खंडाळा : शिरवळ, ता. खंडाळा येथील मंडाईमाता मंदिर परिसरातील काळा डोह येथे खेळताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने कृष्णा उर्फ बाबू आनंदा जाधव (वय 4) या लहानग्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी 9 च्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिरवळ येथील मंडाई कॉलनीत जाधव परिवार वास्तव्यास आहे. या कुटुंबातील कृष्णा जाधव हा चार वर्षांचा मुलगा गुरुवारी (दि. 10) सकाळी 9 च्या सुमारास मंडाईमाता मंदिर परिसरात नीरा नदीपात्रात काळा डोहलगत टायरने खेळत होता.
त्याचा अचानक तोल जाऊन, तो पाण्यात बुडाला. त्यावेळी तेथे कोणी नसल्याने कृष्णा हा पाण्यात बुडल्याचे कोणालाही समजले नाही. मात्र, बराच वेळ झाला तरी कृष्णा दिसत नसल्याने कुटुंबीय आणि स्थानिक तरुणांनी परिसरामध्ये शोध सुरू केला. नीरा नदीपात्रालगत असलेल्या काळा डोह नामक पात्रालगत कृष्णा खेळत असलेला टायर सापडला.
त्यामुळे कृष्णा पाण्यात बुडल्याची भीती व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शशिकांत भगत, अंमलदार विशाल काटे, प्रशांत धुमाळ, अरविंद बार्हाळे, भाऊसाहेब दिघे, शिरवळ रेस्क्यू टीम, भोर जलआपत्ती समितीचे सदस्य आणि स्थानिक तरुणांना बोलावण्यात आले. त्यांनी नीरा नदी परिसरात शोध घेतला असता, कृष्णाचा मृतदेह तब्बल 9 तासांनी नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला आढळला.
शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन, मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची फिर्याद निखिल जाधव यांनी दिली असून, पोलीस अंमलदार प्रशांत धुमाळ तपास करत आहेत.





