सातारा : शाळेतील तसेच ऑफ़िसच्या डब्यातील पदार्थ, चपात्या, रस्त्यावरील खाद्य पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्र, प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम, फॅाईलमध्ये गुंडाळले जातात. त्याचा खाद्यपदार्थांवर होणाऱ्या परिणामाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वर्तमानपत्राच्या कागदात बांधलेले खाद्यपदार्थ खाणे अनेक प्रकारे जीवघेणं ठरू शकते, असे सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. चैत्रा देशपांडे यांनी सांगितले.

वृत्तपत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये अतिशय घातक केमिकल असतात. ते बायोॲक्टिव्ह असल्याने शरीरात गेल्यावर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खास करुन पोटाशी संबंधित विकाराचा धोका निर्माण होतो. प्रिंटिंगच्या शाईमध्ये शिसे आणि जड धातूंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा कागदात अन्न बांधून ठेवल्यास ते रसायन अन्नाच्या संपर्कात येते त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतो.

आपण दैनंदिन दिनचर्येत बहुतांश वेळा पॅकेज अन्नाचा वापर करतो. ते अन्न सुरक्षित, ताजे व गरम म्हणून ते चांगले असा भ्रम असतो. परंतु, ते आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण बहुतांश खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये प्लॅस्टिकचे घटक आणि घातक रसायने वापरलेली असतात. ती अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि कर्करोगासारख्या इतर अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतात. डॉ. चैत्रा देशपांडे सांगतात की, रस्त्यावर विकले जाणारे पदार्थ वृत्तपत्रांच्या कागदामध्ये पॅक केले जातात.

यामध्ये तळलेल्या पदार्थांचे प्रमाण अधिक असते. पदार्थांमधील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी त्या कागदाचा वापर करतात. स्वयंपाकघरातही तळण्याचे पदार्थ कागदावर काढले जातात. यामुळे हे पदार्थ विविध रसायनांच्या संपर्कात येऊन अन्नात मिसळतात. प्रिंटींगसाठी वापरलेले रंग खाण्यायोग्य नसतात. गरम अन्न किंवा तेलाच्या संपर्कात कागद येतो तेव्हा ते हानिकारक रसायने आणि रंग शोषून घेतात. त्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.