सातारा : कराडजवळील नांदलापूर येथे टेम्पो-रिक्षाच्या धडकेत पाच जखमी

कराड – पुणे- बंगळुरु महामार्गावर नांदलापूर फाटा येथे टेम्पो- रिक्षाच्या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून प्राथमिक माहितीनुसार पाच जण जखमी झाले आहेत. आज बुधवार दि. ४ मे रोजी सकाळी ९वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, कराडहून कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. टेम्पोने (एम एच १४- जे एल ८१८८) रिक्षाला (एमेच ११- ८५६२) पाठीमागून धडक दिली. त्यात पाच जण जखमी झाले.
जखमीत एका लहान मुलीचा समावेश आहे. रिक्षा कराड- उंडाळे मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठा आवाज झाल्याने अपघातस्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. जखमींना कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा उडाला. कराड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्थित केली. तसेच हायवे हेल्पलाइन कर्मचाऱ्यांनी तात्काळ वाहने बाजू केली.





