Satara : कुरुंदकरांसारख्या निर्भीड विचारवंतांची आज गरज

सातारा : नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या निर्भीड विचारवंतांची महाराष्ट्राला आज मोठी गरज आहे, असे मत संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. नरहर कुरुंदकर विचारमंचच्यावतीने नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये ‘महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरा व नरहर कुरुंदकर’ या विषयावर कुबेर यांचे व्याख्यान झाले. मंचावर संयोजक किशोर बेडकिहाळ व दिनकर झिंब्रे उपस्थित होते.
कुबेर म्हणाले, लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी योग्य प्रश्न निडरपणे विचारणे हे विचारवंतांचे काम आहे. त्यांची आज उणीव भासत आहे. नरहर कुरुंदकर यांचा वैचारिक पल्ला अलौकिक होता. त्यांचा मोठेपणा असा की ते डावे की उजवे, हे शेवटपर्यंत कळत नसे. त्यांनी दोन्हीकडच्यांना खडसावले. महाराष्ट्राच्या समाज प्रबोधन परंपरेत त्यांचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. धर्मसत्ता व राजसत्ता वेगळी असली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. आज याबाबतचा व्यवहार चिंताजनक आहे.
आधुनिक समाजात लोकशाही आणि समानतेचे तत्त्व रुजवावे लागते. याबाबत महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी मोठे काम केले आहे. त्याचा आढावा कुबेर यांनी घेतला. पश्चिम बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या कामाचे काय झाले, असा प्रश्न पडतोय. ‘माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे’ हे सांगण्याचे धाडस रखमाबाई राऊत यांनी 19 व्या शतकात केले. इंग्लंडच्या राणीकडे दाद मागून संमतीवयाचा कायदा करण्यास त्यांनी भाग पाडल्याचे कुबेर यांनी सांगितले.
डॉ. आंबेडकरांनी विद्यार्थीदशेत रुपयाच्या मूल्याबाबतच्या शोधनिबंधात मांडलेल्या गंभीर चिंतनाची दखल घेऊन, इंग्लंडच्या सरकारने नेमलेल्या समितीच्या शिफारशींनुसार भारताच्या रिझर्व बँकेची निर्मिती झाली आहे. याचा विसर पडता कामा नये, असे कुबेर यांनी सांगितले. बेडकिहाळ यांनी प्रास्ताविक केले. झिंब्रे यांनी आभार मानले.





