Satara : झेडपी, पंचायत समित्यांमध्ये बोगस तक्रारदारांचा सुळसुळाट

सातारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेचा राज्यातच नव्हे तर देशात नावलाैकिक आहे. मात्र काही विघ्नसंतोषींकडून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना टार्गेट करुन तक्रारींचे प्रकार वाढले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये बोगस तक्रारदारांचा सुळसुळाट असून अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे. परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. ग्रामविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात त्यांचे प्रशासन टार्गेट केले जात असल्याने या प्रकाराचे गांभिर्य वाढताना दिसत असून प्रशासनाने बोगस तक्रारदारांचा बिमोड करावा, अशी मागणी होत आहे.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्हा परिषदेने राज्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नेहमीच वेगळा ठसा उमटवला आहे. राज्यातच नव्हे तर देशात उठावदार कामगिरी करुन विविध बक्षीसे मिळवली आहेत. सातारा जिल्ह्यात कधी कोणी वावगे वागले तर त्या अधिकाऱ्यांना तसा धडाही शिकवला आहे. मात्र, सातारा जिल्ह्याचे नाव उंचावण्याचे काम होत असताना कोणी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असेल तर जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब योग्य नाही.
प्रशासकीय विविध बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिली आहे. प्रशासन चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्रुटींबाबत जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून तक्रारी येत असतात. प्रत्येक विभागाशी निगडीत तक्रारीची गांभिर्याने दखल घेत त्याची चौकशी करण्यात येते. तक्रारीत तथ्य असेल तर कारवाई होते तथ्य नसेल तर तक्रार निकाली काढण्यात येते. दाखल तक्रारींवर केलेल्या कारवाईची प्रशासनाकडून माहिती घेतली जाते. गंभीर तक्रारींची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करुन अहवाल देण्यात येतो. साधारणत: जिल्हा परिषदेत आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहिला आहे.
जिल्हा परिषदेत विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कार्यालयांबद्दल अनेक तक्रारी येत असतात. संबंधित तक्रारीची शहानिशा करुन त्याची चौकशीही करण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये बोगस तक्रारींचा सुळसुळाट वाढला आहे. दाखल तक्रारींच्या चौकशीदरम्यान काही तक्रारी संबंधित व्यक्तीच्या नावावर दुसर्यानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. तक्रारदारास चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर संबंधित तक्रारदार ‘तो मी नव्हेच’ असे सांगत असल्याने अनेक तक्रारी बोगस असल्याचे दिसत आहे. खोट्या तक्रारींमुळे जिल्हा परिषदेची बदनामी करण्याचा तर कोणी प्रयत्न करत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने बोगस तक्रारदारांचा भांडाफोड करावा, अशी मागणी होत आहे.
मध्यस्थांकडून होताहेत भानगडी
जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधी अतिशय संवेदनशील असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नेहमीच पारदर्शक कारभाराला प्राधान्य देण्यात येते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना टार्गेट करुन त्यांना वेठीस धरण्यात येत आहे. निश्चितच कोणावर अन्याय झाला तर तक्रार करुन संबंधितांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र बऱ्याचवेळेला तक्रारदाराच्या नावाखाली मध्यस्थांकडून अनेक भानगडी होत आहेत. अशा बोगस आणि खोट्या तक्रारींमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानसिकता ढळत असून ही बाब गांभिर्याने घेण्याची गरज आहे.
जिल्हा परिषदेत आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी करुन चुकीचे आढळल्यास कारवाई करण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाला नाहक त्रास देण्यासाठी बोगस तक्रारी दाखल होत असल्याचे पुढे येत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार वाढत असून प्रशासनावर दबाव आणण्याचा काही लाेकांकडून प्रयत्न होत आहे. प्रशासन कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्वच्छ व पारदर्शक कारभार करत राहील.
– याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी





