Satara : कॉपी झाल्यास परीक्षा केंद्र कायमचे रद्द

सातारा : यंदाच्या दहावी- बारावी बोर्ड परीक्षा संचलनात राज्य मंडळांने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या परीक्षेत जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत. कॉपी झाल्यास संबंधित परीक्षा केंद्र कायमचे रद्द करण्यात येणार आहे. याचबरोबर गैरप्रकारास उद्युक्त करणारे, मदत करणारे व गैरप्रकारात सामील असणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय मंडळाचे अध्यक्ष, सचिव ऑनलाइन उपस्थित होते. जिल्हा प्रसासनामार्फत राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरात ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी करण्यात येणार आहे.
परीक्षा सुरू होण्याअगोदर केंद्रांवरील भौतिक सुविधांची खात्री प्रशासन करेल. परीक्षा सुरु असताना केंद्रांबाहेर व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरारी पथके व बैठी पथके नेमण्यात येणार आहेत. केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची चेहरा स्कॅनिंग करून ओळखद्वारे तपासणी होईल. प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास ओळखपत्र असेल. दरवर्षीप्रमाणे परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.
मागील पाच वर्षात झालेल्या बोर्ड परीक्षेत गैरप्रकार आढळून आलेल्या सर्व परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात येत आहेत. यावर्षीच्या परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळतील अशा केंद्रांची मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्यात येणार आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, पालक सचिव, नामांकित व्यक्ती आवाहन करणार आहेत.
परीक्षार्थीसाठी राज्य मंडळाकडून ऑनलाइन समुपदेशन करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळाने सहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विभागाबाबतचे आदेश विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी जारी केले आहेत.
सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रचालकांना समक्ष बैठकीत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– राजेश क्षीरसागर (विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ)





