Satara : मराठीच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे

सातारा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी साहित्यक व विचारवंत या सर्वांची असून समाजातील प्रत्येक घटकाने यामध्ये योगदान द्यावे, यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनामार्फत केली जाईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 20 वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा याचे आयोजन येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे होते.
यावेळी श्री. सामंत बोलत होते. माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष यशवंतराव गडाख पाटील, आमदार विश्वजित कदम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारी समितीचे सदस्य ॲड. भगीरथ शिंदे, अनिल पाटील, विकास देशमुख, बी. एन. पवार, डॉ. राजेंद्र मोरे, अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, उद्योजक हणमंतराव गायकवाड, रामशेठ ठाकूर, विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर आदी उपस्थित होते.
पुढील वर्षी पासून जागतिक मराठी अकादमीतर्फे भरविण्यात येणाऱ्या संमेलनाला शासनामार्फत निधी दिला जाईल, असे सांगून मंत्री सामंत म्हणाले, जगभरात मराठी जतन करण्यासाठी काम केले जाते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जे- जे करता येईल ते केले जाईल. देशातील उद्योजक जर महाराष्ट्रात येऊन उद्योग करणार असतील त्यांच्यासाठी लवकरच योजना तयार करण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेसोबत शासन खंबीरपणे पाठीशी उभे राहिल, असेही त्यांनी सांगितले. ॲड. आशिष शेलार म्हणाले, मराठी भाषेमध्ये शब्दांचे भांडार आहे. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या बोली बोलल्या जातात. याचे संवर्धन करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.
डॉ. आ. ह .साळुंखे म्हणाले की भारत खऱ्या अर्थाने महासत्ता व्हायचा असेल स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची प्रतिष्ठापना केल्याशिवाय तो पुढे जाणार नाही. मुलामुलीमध्ये लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टीकोन तयार करण्याची आवश्यकता आहे. आपल्या मराठीचा अभिमान आहे. पण आपण हिंदी आणि इंग्रजी भाषा देखील शिकविल्या पाहिजेत. जगभरातील देशात मराठी माणसे स्थिरावली असली तरीही हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकून आपण सर्वांशी संवाद ठेवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.





