Satara : इलेक्ट्रिक वाहने वाढली; मात्र चॅर्जिंग स्टेशनची कमतरता

सातारा : इलेक्ट्रिक वाहनांकडे (ईव्ही) सातारकरांचा ओढा वाढला आहे. मात्र, एका बाजूला इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना त्या तुलनेत सातारा शहरालगतचा परिसर, ग्रामीण भागातील मुख्य रस्ते व राष्ट्रीय महामार्गावर चॅर्जिंग स्टेशनची संख्या अपुरी आहे. इलेक्ट्रीक वाहने चालविताना सर्वात मोठी चिंता चार्जिंगची असते. यावर शहरांमध्ये चार्जिंगचा पर्याय उपलब्ध असला तरी महामार्गावरुन अथवा ग्रामीण भागात प्रवास करताना अडचणी येत आहेत. महामार्गावर वाहनांचे चार्जिंग संपल्यानंतर वाहनचालकांना पायपीट करण्याची वेळ येते. त्यामुळे शिरवळ ते कराड या मार्गावर व ग्रामीण भागात राज्य मार्गांवर चार्जिंग स्टेशन वाढवण्याची गरज आहे.
दुचाकी व चारचाकी वाहन वापरात होणाऱ्या खर्चात बचत, इंधनाचे वाढलेले दर व पर्यावरणाच्या समतोलासाठी निर्माण झालेल्या जागरूकतेमुळे दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पर्यावरणाच्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सरकारने ईलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. मात्र, चार्जिंगची सुविधा ही सर्वात चिंता असलेली बाब आहे.
सध्या या वाहनांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल असला तरी तो आणखीन वाढवण्यासाठी शासनाने शासकीय कार्यालये, प्रत्येक टोलनाका व पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन उपलब्ध करणे आवश्यक आहे. शिरवळ ते कराड मार्गावर चार्जिंग स्टेशनची संख्या कमी आहे. त्याचबरोबर राज्य मार्गांवरही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकदा चार्जिंग अभावी वाहनचालकांना पायपीट करण्याची वेळ येत आहे. याबाबत आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.
जिल्ह्यात ७ हजार ३१४ इलेक्ट्रिक वाहने
सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आतापर्यंत एकूण वाहनांची नोंद चार लाख ७६ हजार ३९० झाली आहे. यामध्ये पेट्रोल वाहनांची संख्या चार लाख १२ हजार असून डिझेल वाहनांची नोंद ३७ हजार ९३० आहे. सीएनजी व पेट्रोल अशी दोन्ही ईंधनांचे एकूण साडेसात हजार वाहने रस्त्यावर धावतात. यामध्ये ईलेक्ट्रिक वाहनांची नोंद सात हजार ३१४ आहे. मात्र,
या एकूण वाहनांच्या तुलनेत ईलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीचा वेग अधिक असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे.
जिल्ह्यातील चार्जिंग स्टेशन
– शिरवळ
– भुईंज
– आनेवाडी टोलनाक्याजवळ
– अजंठा चौकाजवळ
– भरतगाव परिसर
– इंदोली
– कराड
इलेक्ट्रिक वाहनांवरील कर सरकारने माफ केल्यामुळे वाहनांच्या किंमतीही काही प्रमाणात कमी आहेत. त्यासोबत पर्यावरणाबाबत जानजागृती झाल्याने व इंधनावरील बचत होत असल्याने ईलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे ईव्ही वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातही ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
– संदीप म्हेत्रे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी





